News Flash

पद वाटणीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत शीतयुद्ध

सांगलीत सत्ताबदलानंतर श्रेयाची लढाई

दिगंबर शिंदे

सांगली महापालिकेत भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यात आघाडीला यश आले. मात्र हे आघाडीचे संयुक्त यश असले तरी या यशाच्या श्रेयावरून एकमेकांमध्ये पडद्याआड जुंपली आहे. काँग्रेसचे संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा अधिक असतानाही महापौर पदाची संधी राष्ट्रवादीला गेली तर, सत्तेच्या वाटणीवरून हमरीतुमरी होण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. पक्षांतर्गत गटबाजीवर वेळीच उपाय शोधण्याऐवजी वाट पाहण्याच्या सवयीमुळे भविष्यात काँग्रेसची फरपट रोखण्यासाठी सक्षम नेतृत्वाचा अभावही जाणवत आहे.

महापालिकेत काँग्रेसचे २० सदस्य तर राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. यापैकी माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसचे संख्याबळ १९ वर आले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी करीत असताना दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढती केल्या होत्या. आघाडीने एकत्र लढत देऊनही महापालिकेची सत्ता मिळविण्यात यश आले नाही. एक खासदार, दोन आमदार, दिमतीला राज्याची सत्ता एवढय़ा जमेच्या बाजू असल्याने भाजपने ७८ पैकी ४१ जागा पक्षाच्या चिन्हावर जिंकल्या होत्या, तर दोन अपक्षांचा पाठिंबा घेऊन स्थायी समितीमध्ये बहुमत कायम राहील अशी व्यवस्था केली.

मात्र, गेल्या अडीच वर्षांत सांगलीच्या आयर्विन पुलाखालून महापुराचे दोन वेळा पाणी वाहून गेले. राज्यात सत्ताबदल होताच आघाडीतील राष्ट्रवादीला पक्ष विस्ताराबरोबरच सत्ता विस्ताराचा मार्ग गवसला. यातूनच महापालिकेतील भाजपची सत्ता उखडून टाकण्याचा डाव रचला गेला. यात पालकमंत्री जयंत पाटील हे यशस्वीही झाले. मात्र या यशाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये मात्र चढाओढ सुरू झाली आहे.

आघाडीच्यावतीने एकत्र येत महापौर पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते या नात्याने आणि दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असल्याने काँग्रेसचा या उमेदवारीवर हक्क होता. मात्र राष्ट्रवादीलाच महापौर पद मिळणार हे गृहीत धरून राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी केली. गेले सहा महिने यासाठी नियोजन सुरू होते. एका माजी महापौरांनी पडद्याआड भाजप सदस्यांना वळवले होते. मात्र अखेरच्या क्षणी या माजी महापौरांना आघाडीकडून उमेदवारी दिली तर आमचे तीन सदस्य भाजपला मतदान करतील असा गर्भित इशारा दिल्यानंतर अखेर सामोपचाराचे उमेदवार म्हणून दिग्विजय सरूयवशी यांना संधी देण्यात आली.

महापालिकेतील काँग्रेसचे १९ सदस्य असले तरी ते तीन वेगवेगळ्या गटात विभागले गेले आहेत. वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांचा एक गट, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या जयश्री पाटील यांचा एक गट आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा एक गट. यामुळे हे तीन गट एकत्र आले तर राष्ट्रवादीची डाळ शिजणार नाही याची जाणीव असल्यानेच हे तीन गट एकत्र येणार नाहीत अशी व्यवस्था केली जाते.

अधिकृतपणे सत्तेची वाटणी कशी आहे याचा खुलासा करण्यासाठी अद्याप ना काँग्रेसचे नेते पुढे आले ना राष्ट्रवादीचे.

सत्तेचे समान वाटप व्हावे, आघाडीतील एका पक्षाकडे महापौर पद आणि अन्य पदे दुसऱ्या  पक्षाकडे असे सत्तेचे वाटप ठरले आहे. यामुळे सत्तेच्या वाटणीवरून दोन्ही काँग्रेसमध्ये समन्वय आहे.

– पृथ्वीराज पाटील, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष

भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून गेलेल्यांचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आघाडीची सत्ता स्थापन करण्यास मदत केली. राज्यातील सत्ताबदलाचा फायदा शहरासाठी व्हावा यासाठी आघाडीच्या माध्यमातून सत्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

– राहुल पवार, राष्ट्रवादी युवा शहर जिल्हाध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 12:16 am

Web Title: cold war between congress and ncp over post sharing abn 97
Next Stories
1 पूर्ववैमनस्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोरच एकावर चाकू हल्ला
2 फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपद्वारे ओळख वाढवून भेटायला बोलवून लुटणारी टोळी गजाआड
3 अपघातग्रस्त टँकरमधून डिझेलची लूट; ३० हजार लिटर डिझेल गायब!
Just Now!
X