News Flash

राज्यभरात गारठा वाढला

शुक्रवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वात कमी ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मुंबई/पुणे : राज्यातील काही जिल्ह्य़ांमध्ये सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होत असल्याने किमान तापमानात घट होऊन गारवा वाढला आहे. मुंबईसह कोकण विभागात काही ठिकाणी तापमान सरासरीच्या आसपास आले असून, विदर्भात काही भागात तापमान सरासरीच्या खाली आले आहे. त्यामुळे या भागात थंडीत वाढ झाली आहे.

उत्तरेकडील राज्यांतून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असले, तरी हवामानातील बदलांमुळे त्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तापमानात वाढ नोंदविण्यात आली.

शुक्रवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वात कमी ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण विभागात मुंबईतील किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या आसपास आहे. अलीबाग, रत्नागिरीतील  तापमान सरासरीपेक्षा १ ते ३ अंशांनी अधिक आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे शहरासह अनेक ठिकाणी  तापमानात घट झाली असली, तरी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ६ ते ८ अंशांनी अधिक आहे. मराठवाडय़ात परभणीवगळता इतर ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास आले आहे. विदर्भात सध्या सर्वाधिक गारवा आहे.

ब्रह्मपुरीसह अमरावती, बुलडाणा, गोंदिया, यवतमाळ येथील किमान तापमान सरासरीच्या खाली आल्याने थंडीत वाढ झाली आहे.

मुंबईत हवेची पातळी वाईट

मुंबईत आठवडाभर हवेची पातळी वाईट स्तरावर नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट स्तरावर पोहचला, तर बोरिवली, अंधेरी आणि वरळी येथे वाईट स्तरावर होता.

थंडीपोषक..

गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, शुक्रवारपासून अनेक ठिकाणी कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होत असून, त्यामुळे थंडीला पोषक वातावारण तयार होत आहे. नव्या वर्षांच्या सुरुवातीला राज्यातील थंडीत मोठय़ा प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.

पावसाची शक्यता..

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. परिणामी काही भागात पावसाही स्थिती कायम आहे. त्यामुळे २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 4:07 am

Web Title: cold wave conditions increased across the maharashtra state zws 70
Next Stories
1 सुरक्षा काढून घेण्याची अण्णा हजारेंची मागणी ;  मुख्यमंत्र्यांना पत्र
2 सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, मुस्लिम समाजाचा जनआक्रोश मोर्चा
3 दिल्लीत वजनदार आणि गल्लीत पोकळ
Just Now!
X