राज्यभरात थंडीचे जोरदार आगमन झाले असून विदर्भात तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. विदर्भात अमरावती आणि गोंदिया शहरात अनुक्रमे १२ व १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.
यावर्षी विदर्भासह राज्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता बघता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच थंडी जाणवायला लागली आहे. विदर्भात अकोल्यामध्ये १५.५, बुलढाणा १६, ब्रह्मपुरी १५.७, चंद्रपूर १६, गोंदिया १२, वाशीम १२.५, वर्धा १३.९ तर यवतमाळात १३.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. दिवाळीनंतर अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, पडसे, ताप आदी आजारांच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. शहर व परिसरात सकाळी आणि सायंकाळी थंडी पडू लागली आहे.
मुंबई-पुण्यात सर्दी, तापाची साथ
मुंबईतील हवामान गेल्या दोन दिवसांत बदलले. किमान तापमान १९.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. पण थंडी मुंबई मुक्कामी येण्यास अद्याप काही दिवस अवकाश आहे. परिणामी दिवसा उन्हामुळे उष्णता आणि सायंकाळनंतर चांगलाच गारठा असे वातावरण तयार झाले आहे. तशात सागरी किनाऱ्यामुळे हवेत बाष्प असते. अशा वातावरणाात विषाणूंची वाढ लवकर होते आणि संसर्गही वेगाने फैलावतो. त्यामुळे आता मुंबईकरांना सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे असे त्रास सुरू झाले आहेत. पुण्यात दिवाळीमध्ये थंडीची चाहूल लागली खरी, पण मध्येच ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार सुरूच आहे. या आठवडय़ात पारा १२ अंशांच्या आसपास पोहोचला. मात्र, त्यात पुन्हा काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कायम आहे.