उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह विदर्भाच्या दिशेने येत असल्याने बहुतांश भागात थंडीची लाट आली आहे. सर्वच भागात किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी गारवा आहे. कोकण विभागात किंचित थंडी आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात कोरडय़ा हवामानाची स्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढणार असल्याने थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आठवडय़ापासून राज्याच्या तापमानात चढ-उतार दिसून येत आहेत. सध्या ढगाळ स्थिती निवळत असल्याने गारव्यात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात थंडीची लाट आली आहे. मध्यंतरीच्या काळात या भागात गारपीट झाली. त्यानंतर दुसऱ्यांदा थंडीची लाट अवतरली आहे. राज्यातील सर्वात कमी तापमान गोंदिया येथे ७.५ अंश नोंदविले गेले. नागपूर, ब्रह्मपुरी या ठिकाणी किमान तापमान ७ ते ८ अंशांवर आहे. विदर्भात इतर ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या आतच आहे.

परभणीचे तापमान सरासरीखाली

मराठवाडय़ात परभणी येथे सर्वाधिक गारठा असून, तेथील तापमान सरासरीखाली आले आहे. औरंगाबाद आणि नांदेड येथेही गारव्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, जळगाव, महाबळेश्वर, सातारा, नाशिक, कोल्हापूर येथील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास असल्याने तेथे रात्री थंडी जाणवते आहे. कोकण विभागातील मुंबई, रत्नागिरी आदी ठिकाणीही किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा किंचित अधिक असल्याने या भागातही काहीसा गारवा आहे.