राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री ना. शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांची हकालपट्टी करत आमदार दीपक केसरकर यांना पक्ष कारणे दाखवा नोटीस बजावत असल्याचे जाहीर केले. दरम्यान आमदार दीपक केसरकर व जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांनी आम्ही काँग्रेसविरोधात नव्हे तर नारायण राणे यांच्या विरोधात आहोत. आम्ही आज पवारसाहेबांच्या दौऱ्यात सहभाग घेतला असता तर जनता आम्हाला माफ करणार नव्हती. म्हणून पवारसाहेबांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सावंतवाडी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी नेत्यावर कारवाईची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, उमेदवार नीलेश राणे, नितेश राणे, संपर्कमंत्री उदय सामंत, खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राजन तेली, सतीश सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष ना. शरदचंद्र पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व आमदार यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले की, माझ्या पक्षाच्या काही लोकांना अवदसा आठवली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यात आघाडी असून राज्यात दोन्ही पक्ष निवडणुका लढवत आहेत. देशाचा प्रश्न असतो तेव्हा देशाचा विचार करतो. देशाचा प्रश्न असताना काही लोक घरातील भांडण या निवडणुकीत बाहेर काढत आहेत असे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी बोललो आहे. त्यांनी जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांना पदावरून दूर करत जिल्हाध्यक्षपदी व्हिक्टर डॉन्टस तर कार्याध्यक्षपदी प्रसाद रेगे आणि जिल्हा युवक अध्यक्षपदी अबीद नाईक यांची निवड केल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.
आमदार दीपक केसरकर यांच्या कारवाईबाबत पक्षाध्यक्ष पवार म्हणाले की, आमदार चौकटीच्या बाहेर जात असेल तर पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावून त्याची भूमिका जाणून घ्यावी लागते. त्यानुसार आमदारांना नोटीस काढून स्पष्टीकरणानंतर कारवाई केली जाईल, असे घोषित केले. पक्ष संघटना स्वत:भोवती घेऊन वावरणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, कोणी कुठे गेला तरी पक्ष उभा राहू शकतो, असे आमदार केसरकर यांना टोला हाणत ना. पवार यांनी व्हिक्टर डॉन्ट्स यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काम करेल, असे आवाहन केले.
पक्षाध्यक्ष ना. पवार हेलिकॉप्टरमधून उतरून विश्रांती घेण्यास गेले असताना सर्वप्रथम आमदार दीपक केसरकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी शेख यांच्या घरी भेट घेतली. तेव्हा ना. पवार यांनी आमदार केसरकर यांच्यावर आगपाखड केली. आमदार दीपक केसरकर यांनी तुमच्या प्रेमाखातर आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे सांगून राजीनामापत्रात कारणमीमांसा नमूद केल्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले होते. त्यानंतर सभेत ना. पवार यांनी राष्ट्रवादीवर कारवाईचे भाष्य केले.
पक्षाध्यक्ष ना. पवार यांनी सभेत कारवाई करण्याचे संकेत दिले असले तरी इकडे आम. दीपक केसरकर यांच्या कार्यालयात जिल्हाभरातील कार्यकर्ते थांबले होते. पवार यांच्या सभेत फक्त पाच पदाधिकारी गेले होते. त्यामुळे आम. केसरकर यांच्या निवासस्थानी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आम. दीपक केसरकर आगे बढो देत दादागिरी नष्ट कराच्या घोषणा सुरूच ठेवल्या होत्या.
आमदार दीपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला
सकाळी पवारसाहेबांना फोन लावला. त्यावेळी सिंधुदुर्गात ते येत असल्याचे समजताच मी आमदारकीचा राजीनामा बनविला. त्यात जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे विस्तृत म्हणणे थोडक्यात पण पवारसाहेबांना कळेल असे लिहिले आहे, असे आमदार केसरकर म्हणाले. जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे राजीनामा पाठविल्याचे बोलताना सांगितले. जिल्हाध्यक्ष बाळ भिसे म्हणाले, माझ्या भावाची राजकीय हत्या झाली होती. जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी दहशतीला कंटाळली होती. राष्ट्रवादीची भूमिका तीन वेळा पवारसाहेबांसमोर ठेवली होती. आघाडीच्या धर्माचे पालन करणे शक्य नसल्याने प्रदेशाध्यक्षाकडे राजीनामा दिला होता, असे भिसे म्हणाले.
पवारसाहेबांना आमदारकीचे राजीनामापत्र देताना प्रेम व निष्ठा तुमच्यावर आहे, पण माझा लढा सिंधुदुर्गच्या शांततेसाठी असल्याने स्टेजवर येऊन तत्त्वाला हरताळ फासणार नाही असे म्हटले असल्याचे आमदार केसरकर म्हणाले. पवारसाहेबांवर निष्ठा असली तरी दहशतवादविरोधातील लढय़ातून माघार घेणार नाही असे त्यांनी सांगून राजकीय गुन्हेगारीविरोधात लढण्यासाठी माझे दैवत पवारसाहेबांचा शब्द पाळला नाही असे आमदार केसरकर म्हणाले.
पक्षावर व पवारसाहेबांना कोणतेही दूषण येऊ नये म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या धर्माला धक्का लागू नये या प्रेमाखातर खऱ्या अर्थाने राणेंच्या विरोधात उभा राहण्याचे सर्वानीच ठरविले आहे. राणेंची झुंडशाही, दहशतवाद व गोरगरिबांचा लढा शेवटपर्यंत लढत राहणार आहे असे आमदार केसरकर म्हणाले.
पवारसाहेब व आमदारकी तसेच जनताही पाहिजे. त्यामुळे जनतेच्या प्रेमापोटी मनस्वी दु:ख पाळत दैवत पवारसाहेबांचा शब्द पाळू शकलो नाही. मात्र जनतेशी बेईमानी करण्यापेक्षा आमदारकी सोडण्याची तयारी दर्शविली आहे. कोणत्याही पक्षात जाण्यासाठी हा राजीनामा नव्हे, असे आमदार केसरकर म्हणाले.
दहशतीच्या विरोधाला झुकणार नाही. जिल्ह्य़ात शांतता राहावी म्हणून लढणार आहे. उद्या सोमवार १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा. बॅ नाथ पै सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन दिशा ठरविणार आहोत, असे आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले.