सर्वत्र दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात उसळी

बीड :  करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी सुरू असतानाच जिल्ह्यात कमी झालेल्या दुसऱ्या लाटेने मागील चार दिवसांपासून उसळी मारल्याचे चित्र आहे. करोनाच्या रुग्णांचा आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे. लाट संपल्याचे मानत नागरिकांनी मुखपट्टय़ा वापरणे जवळपास बंद करून सर्वत्र सार्वत्रिक कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू आहेत. तर आंदोलने आणि मोर्चेही जोरात असून राजकीय पुढारी आणि धार्मिक कार्यक्रमांचीही रेलचेल वाढली आहे. ग्रामीण भागात तपासणी होत असल्याने रुग्णसंख्याही वाढू लागली असून शहरी भागात तपासणीकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारीही रजेवर असून करोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात गुरुवारी नवीन २१२ रुग्णांची नोंद झाली. आष्टी तालुक्यात सर्वाधिक ७१ रुग्ण आढळले असून वाढत्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील रुग्ण अधिक आहेत. शहरामध्ये सायंकाळी चारनंतर दुकाने बंद असली तरी लोकांचा संचार मुक्त आहे. शहरात मुखपट्टय़ा वापरणेही आता कमी झाले असून दुसरी लाट ओसरल्याच्या आविर्भावात सार्वजनिक कार्यक्रमांचीही रेलचेल सुरू आहे. जिल्हा प्रशासन रुग्ण वाढले की नवा आदेश काढून निर्बंध लागू करते. प्रत्यक्षात मात्र करोनाच्या कुठल्याच निर्बंधाचे पालन होत नसल्याचे एकूण चित्र आहे. दोन महिन्यापूर्वी दीड हजाराच्या पुढे असलेली रुग्णसंख्या दोनशेच्या आत आली. मराठवाडय़ातही बहुतांश जिल्ह्यात करोनाची रुग्ण संख्या कमी झाली असताना मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढली आहे. विभागातील आठ पैकी सात जिल्ह्यात दोनशे तर एकटय़ा बीड जिल्ह्यात जवळपास अडीचशे रुग्ण सापडले आहेत. ग्रामीण भागात वाढत्या रुग्ण संख्येने जिल्हा प्रशासनाने निर्बंध कडक केले असले तरी अंमलबजावणी होत नाही आणि तपासणी होत असल्याने रुग्णसंख्या दिसू लागली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप महिनाभरापासून रजेवर असल्याने प्रभारी प्रशासन नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असले तरी करोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र आहे.

एक दिवसाआड आंदोलने आणि मोर्चे

बीड  जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. जमावबंदी लागू असून सोमवार ते शुक्रवारी सायंकाळी पाच नंतर संचारबंदी आहे. मात्र ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे पहायला मिळत आहे. एक दिवसाआड  विविध संघटना, पक्ष यांचे आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. आंदोलनामध्ये किमान पन्नास लोक असतात. यापेक्षाही अनेक मोठे मोर्चे काढले जात आहेत. विविध मागण्यांसाठी उपोषण, घेराव, रास्तारोको अशी गर्दी होणारी आंदोलने संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरू  लागली आहेत.