विरार : प्राणवायूंची मागणी वाढल्याने रुग्णालयांनी प्राणवायूचा मर्यादित वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. प्राणवायूचा अनावश्यक वापर होऊ  नये, गरजवंतांना प्राणवायू मिळावा यासाठी या सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्या शहराला पाच पट अधिक प्राणवायूची मागणी वाढली आहे. यामुळे प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रिफिलिंग वेळेवर मिळत नसल्याने अनेक जिल्’ात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. पण दिवसेंदिवस वाढती मागणी शासनाच्या चिंता वाढवत आहे. यामुळे उपलब्ध साठ्याचा जपून वापर करण्याचे आदेश रुग्णालयांना देण्यात आले आहेत. ज्यांची प्राणवायूची पातळी ९३ ते ९५ च्या दरम्यान आहे त्यांना प्राणवायूची गरज नसतानाही लावू नये, तसेच कृत्रिम श्वासनयंत्रणेवरील (व्हेंटिलेटर) रुग्णांची प्राणवायू  पातळी ८८ ते ९२ च्या दरम्यान असेल अशा रुग्णांना सध्या प्राणवायू नाही दिला तरी चालेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रेमडेसिविर औषधांना रुग्ण प्रतिसाद देत असेल तर त्याला प्राणवायूची गरज नाही, असेही या आदेशात म्हटले आहे.

तत्काळ आवश्यक नसलेल्या सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर कोविड नसलेल्या रुग्णालयातील ऑक्सिजनच्या वापराची तपासणी करावी. तसेच घरी अलगीकरणात असलेल्या रुग्णांना आवश्यकता असल्यावर प्राणवायूच्या सिलेंडरचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहेत.