पंढरपुरातील विकासकामांना गती देणार असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले. आषाढी यात्रा ३ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पाश्र्वभूमीवर सर्व विकास कामे दर्जेदार करण्याच्या दृष्टीने पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. सोलापूर जिल्हाधिकारी पदी रुजू झाल्या नंतर रणजितकुमार यांनी मंगळवारी पंढरपूर येथे भेट दिली.
श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या सभापतिपदाचा पदभार त्यांनी या वेळी स्वीकारला. मंदिर समितीची बठक घेऊन विविध विकास कामे, यात्रेचे नियोजन,भाविकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा आदींची माहिती घेतली. दर्शन मंडप, मंदिर परिसर आणि मंदिराची संपूर्ण पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. त्या नंतर चंद्रभागा नदीच्या पलतीरावर भाविकांच्या सोयीसाठी बांधलेले ६५ एकर जागेची पाहणी केली. या ठिकाणी झालेल्या कामाची पाहणी केली आणि नियोजित कामांची माहिती घेतली. तसेच शहरात विविध ठिकाणी नव्याने बांधण्यात येत असलेल्या शौचालयाची पाहणी केली. चंद्रभागा नदी आणि वाळवंट येथेही भेट दिली. त्यानंतर विश्रामगृह येथे सर्व अधिकाऱ्यांची बठक घेतली. त्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी त्यांची भूमिका पत्रकारासमोर मांडली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना देणार, सगळ्यांना सोबत घेऊन कामे करणार असे त्यांनी या वेळी सांगितले. पंढरपूरच्या बाबतीत विकासकामे दर्जेदार होतील या दृष्टीने पावले उचलणार आहे असे स्पष्ट केले. तसेच विकासकामांना गती देणार असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंढरपुरात पहिल्यांदा आल्यावर रणजितकुमार यांनी श्री विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतले. या वेळी मंदिर समितीच्या वतीने त्याचा सत्कार प्रांताधिकारी संजय तेली, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी केला. या वेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.