टोळक्याने केलेल्या मारहाणीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री नाशिकरोड येथे घडली. या घटनेनंतर जेलरोड परिसरात गुरुवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. सौरव नारायण बर्वे (२१) असे या युवकाचे नाव आहे. गोरेवाडी येथे तो वास्तव्यास होता. याप्रकरणी मृताचा भाऊ कुमार बर्वे यांनी पोलिसात तक्रार दिली. सौरव हा रात्री नऊच्या सुमारास मित्रांसमवेत उभा होता. या वेळी राज नारायणे, प्रतीक बर्वे, पप्पू धाडगे, नीलेश बोराडे, सचिन कळमकर, निरभवणे व त्यांचे इतर साथीदार आले. त्यांनी सौरव व त्याच्या मित्रांना बेदम मारहाण केली. ही माहिती कळल्यावर आपण घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी मारहाण करणाऱ्या युवकांनी आपणासही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या वेळी पप्पू घाळगेने कोयत्याने वार केला. त्यात सौरव गंभीर जखमी झाला. त्याला त्याच अवस्थेत रिक्षात टाकून टोळके घेऊन गेले. काही वेळाने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आल्यावर ही माहिती समजली. उपचार सुरू असताना सौरवचे गुरुवारी पहाटे निधन झाले. या घटनेमुळे गुरुवारी दिवसभर जेलरोड परिसरात तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरव हा संदीप फाऊंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता.