विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारी अखेरच्या दिवशी उमेदवारांची एकच झुंबड उडाली होती. आघाडी व महायुतीमध्ये फू ट पडल्याने जिल्ह्यातील सर्व दहा मतदारसंघात पंचरंगी व त्याहून अधिक रंगाच्या लढती होणार असल्याचे आज स्पष्ट झाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष उल्हास पाटील यांनी उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश करुन उमेदवारी अर्ज भरला. तर इचलकरंजीत भाजपाचे ज्येष्ठ मिश्रीलाल जाजू यांनी बंडाचा झेंडा घेतला. त्यांनी जय जनसेवा पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र धर्यशील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिरोळमध्ये तर सत्त्वशील माने यांनी अपक्ष म्हणून इचलकरंजीतून अर्ज दाखल केला. आज अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुखांमध्ये आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार राजीव आवळे, सत्यजित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, भाजपाचे नगर अध्यक्ष महेश जाधव यांचा समावेश आहे.
सत्तेचा बदलता कल लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून लढण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. पण उमेदवारी अर्ज न मिळाल्याने शिरोळ व इचलकरंजी मतदारसंघात बंडखोरी झाली. गतवेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानीकडून लढलेले उल्हास पाटील यांना उमेदवारी नाकारुन जिल्हा परिषदेचे सभापती सावकार मादनाईक यांना दिली. यामुळे उल्हास पाटील यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन या मतदारसंघातून अर्ज दाखल केला. या मतदारसंघात राष्ट्रवादीने राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एबी फॉर्म दिला होता. पण आज अचानक धर्यशील माने यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे एकाच पक्षाचे दोन एबी फॉर्म असलेले उमेदवार असल्याने खरा उमेदवार कोण याची चर्चा सुरु झाली आहे. पक्षाची भूमिका लक्षात घेऊन यड्रावकर यांनी आपल्या पत्नी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा स्वरुपा पाटील यड्रावकर यांचा अर्ज दाखल केला आहे.
इचलकरंजी मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर उमेदवारी वैधतेची टांगती तलवार असल्यामुळे त्यांनी आपल्या बरोबरच आपल्या पत्नी भारती यांचाही अर्ज दाखल केला आहे. तर भाजपाचे ज्येष्ठ कार्यकत्रे मिश्रीलाल जाजू यांनी बंडखोरी करताना जय जनसेवा पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात शिवसेनेचे मुरलीधर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव मदन कारंडे यांनीही अर्ज भरले.
कुपेकर घराण्यात उमेदवारीवरुन वाद सुरु होता. तीन दिवसापूर्वी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी अर्ज न भरण्याची भूमिका घेतली होती. पण आज त्यांनी अचानक अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे, सत्यजित कदम, महेश जाधव, विजय देवणे आदींचे शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले.