प्रत्येक वेळच्या निवडणुकीपेक्षा यंदा आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील चार जागांसाठी मोठय़ा संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महायुती व आघाडीचा काडीमोड झाल्याने जिल्ह्यात भाजप, शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादी व मनसे यांच्यात पंचरंगी लढती होणार आहेत.
उस्मानाबाद मतदारसंघात काँग्रेसकडून जनता बँकेचे माजी अध्यक्ष विश्वास िशदे, राष्ट्रवादीकडून माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेकडून आमदार ओम राजेिनबाळकर, भाजपकडून जि. प.चे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर व मनसेकडून संजय यादव यांनी अर्ज दाखल केले. राजेिनबाळकर व पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. अन्य तीन उमेदवारांत होणारी मतविभागणी शिवसेनेसाठी त्रासदायक ठरणार आहे.
तुळजापूर मतदारसंघात पालकमंत्री, काँग्रेसचे उमेदवार मधुकर चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, भाजपकडून संजय िनबाळकर, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख सुधीर पाटील व मनसेकडून देवानंद रोचकरी यांनी दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व जि. प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनीही अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीकडून जीवन गोरे की, महेंद्र धुरगुडे, हा पेच अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सुटणार आहे.
परंडा मतदारसंघात शिवसेनेकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादीकडून आमदार राहुल मोटे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून जि. प.चे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील-हाडोंग्रीकर, काँग्रेसकडून माजी नगरसेवक अ‍ॅड. नुरुद्दीन चौधरी व मनसेकडून भूमचे तालुकाध्यक्ष गणेश शेंडगे यांनी अर्ज दाखल केले. मतदारसंघातील भाजपची जागा रासपला सोडल्यामुळे हाडोंग्रीकर यांना भाजपची ताकद मिळणार आहे. आमदार राहुल मोटे हॅट्ट्रीक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांचे आव्हान परतवून लावण्याचा पाटील व हाडोंग्रीकर यांचा प्रयत्न असेल.
उमरगा मतदारसंघात शिवसेनेकडून आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीकडून डॉ. संजय गायकवाड, काँग्रेसकडून माजी जि. प. सभापती किसन कांबळे, भाजपकडून जि. प. सदस्य कैलास िशदे व मनसेकडून विजय क्षीरसागर यांनी अर्ज दाखल केले. शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्यात चौगुले यशस्वी ठरतात काय, ते इतर पक्षांच्या उमेदवारांच्या ताकदीवर अवलंबून आहे.