News Flash

बहुरंगी लढतीचा महसूलमंत्र्यांना फायदा?

यावेळी प्रथमच प्रमुख पक्षांचे उमेदवार पक्षचिन्हासह विधानसभेच्या रिंगणात असल्याने बहुरंगी लढतीचा फायदा कोणाला होतो, यावर चर्चा केंद्रित झाली आहे. एकास एक उमेदवार असतानाही बाळासाहेब थोरात

| September 30, 2014 02:35 am

यावेळी प्रथमच प्रमुख पक्षांचे उमेदवार पक्षचिन्हासह विधानसभेच्या रिंगणात असल्याने बहुरंगी लढतीचा फायदा कोणाला होतो, यावर चर्चा केंद्रित झाली आहे. एकास एक उमेदवार असतानाही बाळासाहेब थोरात यांना नेहमीच चढते मताधिक्क्य़ मिळाल्याचा इतिहास लक्षात घेता बहुरंगी लढतीत मतविभागणीचा सर्वाधिक फायदा त्यांनाच मिळण्याची चिन्हे आहेत. अर्थात निवडणुकीचे वातावरण कसे तापते, कोणकोणती वळणे घेते यावरही बरेच काही अवलंबून असेल.
काँग्रेसच्या विरोधात मनसे वगळता राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा अशा प्रमुख पक्षांचे उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. गेली ३० वर्ष थोरात या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मतदारसंघाशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क, सहकारी संस्थाच्या माध्यमातून तालुकाभर असलेल्या विश्वासू कार्यकर्त्यांचे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांचे काम राज्यात लक्षवेधी ठरले आहे. निवडणुकीपूर्वी वर्षभर आधीच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी तालुका िपजून काढलेला आहे. नाशिक-पुणे बाह्यवळण मार्ग, शहरात झालेले प्रशासकीय भवन, पंचायत समिती कार्यालय, अनंत फंदी नाटय़गृह, नवीन तहसील कार्यालय, शहरासाठीची पाणीयोजना अशी ठळक कामे गेल्या पाच वर्षांत पूर्ण झाली. निळवंडे धरण हे त्यांच्या कारकीर्दीत घडलेले सर्वात लक्षवेधी काम असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.
राष्ट्रवादीने तालुकाध्यक्ष आणि एस. आर. थोरात उद्योग समूहाचे प्रमख आबासाहेब थोरात यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांचे वडील दिवंगत संभाजीराजे थोरात यांनीही विधानसभेची निवडणूक लढविलेली होती. त्यामुळे आबासाहेबांना निवडणुकीचा अनुभव नवीन नाही. त्यांच्या उद्योग समूहाची विश्वासार्हता मोठी असून त्याच माध्यमातून गावोगाव संपर्कही आहे. त्याचे मतात परिवर्तन करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल. पक्षाचे तालुकाध्यक्ष झाल्यानंतर कार्यकर्त्यांमधील मरगळ बाजूला करत विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते चर्चेत राहिले. शिवसेनेच्या उमेदवाराविषयी मोठी उत्सुकता होती. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काही प्रमुख मंडळींनी पक्षप्रवेश केला, त्यातच मूळचे निष्ठावंत स्पर्धेत उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र होते. शिवसेनेने अखेर बाहेरून आलेल्या जनार्दन आहेर यांना उमेदवारी बहाल केली. आहेर राष्ट्रवादीचे घारगाव गटातील माजी जि. प. सदस्य असून त्यांच्या पत्नी सध्या या गटाच्या राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत. मात्र त्यांचा घारगाव गट विधानसभेसाठी अकोले मतदारसंघात समाविष्ट आहे. राष्ट्रवादीत पिचड समर्थक मानण्यात येणाऱ्या आहेरांनी गेल्याच आठवडय़ात शिवसेना प्रवेश केला होता. निष्ठावंताना सोबत घेत पक्षांतर्गत सर्व गट-तटांचे मनोमिलन घडवून आणण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे. भाजपचे उमेदवार उद्योजक राजेश चौधरी तुलनेने नवखे आहेत. पक्ष म्हणून कायम शिवसेनेसोबत फरपट झालेल्या भाजपाची तालुक्यातील पक्षबांधणी तशी तोळामासा आहे. तालुक्यात कोणता पक्ष किती पाण्यात आहे हे स्पष्ट करणारी ही निवडणूक असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 2:35 am

Web Title: colorful fight in sangamner
टॅग : Election
Next Stories
1 माढय़ात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी जिल्हाध्यक्षांनी केली दोन कोटींची मागणी
2 महेश कोठे शिवसेनेकडून की अपक्ष?
3 रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सेना-मनसेची हातमिळवणी
Just Now!
X