X

कास पठारावर सप्तरंगांची उधळण

सध्या पठारावर अबोलिका, नाभाळी, ड्रौसेरा, कंदील, सीतेची आसवे ,गेंद आदी जातीची फुले आली आहेत. 

वाई : जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावर वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांची उधळण झाली आहे. त्याचाआनंद लुटण्यासाठी अभ्यासक ,पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सातारा वन विभाग व कास पठार कार्यकारी समिती या वर्षीच्या  पर्यटन हंगामात हंगाम सर्वाना पाहता यावा यासाठी पर्यटकांच्या स्वागताची तयारी केली आहे . गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग करावे असे आवाहन वन विभागाने केले आहे .

या वर्षीच्या कास पठारावरील फुलांच्या हंगामास सुरवात झाली आहे.दुर्मीळ आणि विविध रंगीत फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत .पाऊस थांबून मागील दोन दिवसात सूर्यप्रकाश येऊ  लागल्याने  फुलांचा हंगाम जोरदार सुरू झाला. मोठय़ा संख्येने पर्यटक कास पठारावर दाखल होऊ लागले आहेत. फुले उमलण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने काही दिवसांत पठारावर फुलांचे गालिचे पाहावयास मिळणार आहेत.

सध्या पठारावर अबोलिका, नाभाळी, ड्रौसेरा, कंदील, सीतेची आसवे ,गेंद आदी जातीची फुले आली आहेत.  कास पठाराला जैव विविधतेच्या दृष्टीने युनेस्कोने मान्यता दिल्यानंतर येथे फुलांच्या हंगामात भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पश्चिम घाटातील एकूण ३९ ठिकाणांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. येथे अडीच हजार ते तीन हजार मिमी पाऊस पडतो .

कास पठाराच्या एकूण १९७२.८५ हेक्टर पैकी सातारा तालुक्यातील ८८३ व जावली तालुक्यातील १०८९ हेक्टर क्षेत्र कास पठाराचे आहे .या क्षेत्रात ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या  वनस्पती आढळतात .यामध्ये ६२४ पैकी ३९ प्रजाती कास पठारावर आहेत .जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात दर १५ ते २० वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक फुलांचा  बहर दिसून येतो.निळ्या ,गुलाबी,जांभळ्या,पांढऱ्या ,पिवळ्या अशा वेगवेगळ्या रंगाची फुलांची उधळण पाहण्यात वेगळीच मजा येते.

तर दरवर्षी मार्च महिन्यात फक्त १५ दिवस पांढरम्य़ा रंगाची लाल पाकळ्यांची फुले येतात. या पठारावर ३२ प्रजातींची फुलपाखरे ,१९ प्रजातींचे सरपटणारे प्राणी ,३० प्रजातींचे पक्षी,१० प्रजातींचे सस्तन प्राणी अशी जैवविविधता आढळते .येथे १० ते १२ प्रकारचे वृक्ष आणि ४०० पेक्षा जास्त फुलांच्या जाती आढळतात .या शिवाय अनेक दुर्मिळ वन्यजीव ,उभयचर व सरपटणारे  प्राणी ,कीटक,फुलपाखरे आढळतात .या पठाराचा आनंद घेण्यासाठी कास  वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे या मध्ये कास,कसाणी,अटाळी ,एकीव ,या बरोबर कुसुंबी व पाटेघर या गावांचा समावेश आहे या गावातून येणारा पैसा गावामध्ये व पठाराचे नैसर्गिक संवर्धन करण्यासाठी वापरला जातो.

परदेशी पर्यटकांचेही आकर्षण

निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटण्यासाठी रशिया ,जर्मनी.अमेरिका ,इंग्लंड ,जपान येथून पर्यटक येतात पठारावर  जेष्ठ नागरिक व दिव्यागाना पुष्प पठाराचा आनंद घेता यावा यासाठी प्रदूषणविरहीत बॅटरी रिक्षाची सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. मागील हंगामाप्रमाणे पठारावर प्रवेशासाठी प्रौढांसाठी प्रति व्यक्ती शंभर व शालेय सहलीसाठी प्रती विध्यार्थी वीस रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक व बारा वर्षांखालील मुलांना शुल्क नाही. पठारावर घाटाई फाटा येथे विनामूल्य वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तेथून पठारावर जाण्यासाठी प्रति व्यक्ती दहा रुपये शुल्क आकारून बसची व्यवस्था आहे. शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पठारावर वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्ताप करावा लागला आहे. यासाठी या वर्षी पुष्प पठाराच्या ६६६.‘ं२.्रल्ल.्रिल्ल या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या पर्यटकानाच सोडले जाणार आहे .अन्य दिवशी पठार गेट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांनी आगाऊ  नोंदणी करूनच पठारावर यावे असे आवाहन वन विभागाने केले आहे.