देशभरातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सीमीच्या फरारी सहापकी दोन दहशतवाद्यांना तेलंगणा पोलिसांनी कंठस्नान घातल्यानंतर उर्वरित चौघांच्या शोधात नांदेड ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी कोिम्बग ऑपरेशन सुरू केले आहे.
बंगळुरू, करीमनगर, पुणे, मध्य प्रदेश तसेच अन्य ठिकाणी झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले सीमी संघटनेचे सहा कुख्यात दहशतवादी सुमारे दीड वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झाले होते. महाराष्ट्र ‘एटीएस’, राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा व वेगवेगळ्या राज्यांतील दहशतवादविरोधी पथके या सहाजणांचा शोध घेत होते. या सहाजणांच्या अटकेसाठी देशभरात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आली. त्यांची गुप्त माहिती देणाऱ्यास बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
एकीकडे या सहाजणांचा शोध चालू असताना शुक्रवारी मध्यरात्री तेलंगणातल्या नलगोंडा जिल्ह्यातील सूर्यपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन संशयित तरुणांची माहिती पोलिसांना मिळाली. तेलंगणा पोलिसांनी पाळत ठेवून छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर या दोघांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अस्लम मो. खान व एजाजोद्दीन या दोघांना पोलिसांनी कंठस्नान घातले. पोलीस चकमकीत ठार झालेला एजाजोद्दीन हा या दहशतवाद्यांचा प्रमुख होता.
या दोघांच्या मृत्यूनंतर आता उर्वरित चौघांच्या शोधासाठी महाराष्ट्र एटीएसने जंगजंग पछाडले आहे. नांदेड जिल्हा कर्नाटक व आंध्र सीमेवर असल्याने, तसेच या सहापकी जाकेर हुसेन उर्फ  सादिकखान याची सासरवाडी नांदेड असल्याने नांदेड एटीएसने कोिम्बग ऑपरेशन सुरू केले आहे. एकीकडे नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनातील दहशतवादविरोधी सेल कोणत्याही हालचालीविना थंड असताना दुसरीकडे ‘एटीएस’ने शुक्रवारच्या घटनेनंतर शहरातील लॉज, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणाची तपासणी सुरू केली. शिवाय फरारी चौघांचे पोस्टर तयार केले. विशेष म्हणजे मराठीसह इंग्रजी, तेलगू, कानडी व िहदी भाषांतून ही पोस्टर तयार केली आहेत. फरारी चौघे नांदेडात वास्तव्यास येऊ शकतात, अशी शक्यता गृहित धरून ‘एटीएस’ने काही खबरे नेमले आहेत.
नांदेड ‘एटीएस’चे एक पथक तेलंगणात आहे. नांदेडच्या पथकासोबत राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील ‘एटीएस’ची पथके तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांत आहेत. दोन साथीदारांच्या मृत्यूनंतर उर्वरित चौघांचे अवसान गळाले असावे, अशी शक्यता गृहित धरून त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नांदेडची सासुरवाडी असलेल्या जाकीर हुसेन याच्यावर विशेष पाळत ठेवण्यात येत आहे. या चौघांपकी कोणी नांदेड वा लगतच्या जिल्ह्यातील तरुणांशी संपर्क करतात काय किंवा त्यांना आíथक मदत कोण व कशा पद्धतीने पुरवते, याची माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.