बेळगाव जिल्ह्यात येळ्ळुर येथे मराठी भाषकावर कर्नाटकच्या पोलिसांकडून झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी मिरज येथे कर्नाटक शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
येळ्ळुर येथे मराठीचा स्वाभिमान जपणाऱ्या महाराष्ट्रप्रेमी लोकांवर बेळगाव पोलिसांनी दंडेलशाही करीत अमानुष अत्याचार केला असून या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मिरजेच्या महाराणा प्रताप चौकात शिवसेनेच्या वतीने कर्नाटक शासनाच्या पुतळ्याचे दहन करू निषेध करण्यात आला.
येळ्ळुर येथील झालेल्या पोलिसी अत्याचाराची सी.बी.आय. मार्फत चौकशी करण्यात यावी, अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर खुनी हल्ल्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावेत व हे खटले विशेष न्यायालयात चालविण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले. या आंदोलनामध्ये गजानन मोरे, आनंद रजपुत, गिरीश जाधव, किरण दबडे, संदीप िदडे आदींसह अनेक शिवसनिक सहभागी झाले होते.