राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला आहे.ये बारामतीमध्ये बघतोच तुला… ५०- ५० वर्ष इथले लोक मला व माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय, अशा शब्दात अजित पवारांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.

पक्षाने जबाबदारी दिल्यास शरद पवारांची बारामतीदेखील जिंकवून दाखवू, असे विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. महाजन यांच्या या विधानाचा अजित पवारांनी शुक्रवारी समाचार घेतला. जळगाव जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारे तुमचे आमचे नेते शरद पवार कृषी मंत्री असते तर आज शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली नसती. शरद पवारांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली आणि आज किती लोकांना कर्जमाफी मिळाली असा सवाल त्यांनी विचारला.

गिरीश महाजन यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, ये बारामतीमध्ये बघतोच तुला… ५०- ५० वर्ष इथले लोक मला व माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय. लोकांना फसवले जात असून त्यांना गाजरं दाखवली जात आहेत. खासगी आयुष्यावर गदा आणली जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. इंग्रजांच्या पारतंत्र्यापेक्षा फार गंभीर पारतंत्र्य या सरकारच्या काळात सुरु असून त्यासाठी परिवर्तन झालेच पाहिजे, हे सरकार गेलेच पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

महापुरुषांच्या स्मारकांचे काम थांबवले जाते आणि दुसरीकडे डान्सबार सुरु करण्याचा निर्णय होतो. हाच का भाजपाचा कारभार? असा सवालही त्यांनी विचारला. नवीन पिढीला चुकीच्या रस्त्याने जाण्यास भाग पाडू नका असेही पवारांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी देखील मोदी व भाजपावर बोचरी टीका केली. २०१४ च्या निवडणुकीतील भाषणं मोदींनी काढून ऐकली तर मायच्यान हे मोदी पुन्हा निवडणूकीला उभे राहणार नाहीत. २०१४ मध्ये आजची तरुणाई हर हर मोदी घर घर मोदी म्हणत होती आणि आज तीच तरुणाई गली गलीमें शोर है चौकीदार चोर है… आणि आता विचारलं तर साडेचार वर्षांत साधी सोयरीकही झाली नाही, असे त्यांनी सांगितले.