गेल्या काही दिवसांत राज्यासह देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. त्यामुळे अनेक शहरात लॉकडाउनचे नियम पुन्हा कडक होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचे निर्देश सरकारकडून वारंवार दिले जात आहेत. अशा परिस्थितीत अकोल्यातील तीन माजी आमदारांवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यात २ डिसेंबरला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शहरातील स्वराज्य भवन येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चात सुमारे ३०० ते ४०० आंदोलक सहभागी झाले होते. या मोर्चात सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्यामुळे तीन माजी आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओबीसी आरक्षण बचाव मोर्च्यात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांनी करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी विविध नियमांचे पालन करणे गरजेचे होते. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे ३ माजी आमदार यांच्यासह ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी मोर्चाचे आयोजन करणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करणे यामुळे कलम १८८, २६९, भादंवि १३५ बीपी ACT तसेच साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह मोर्च्यांतील ३३ जणांचा समावेश आहे. या साऱ्यांविरोधात करोनासंबंधीचे नियम न पाळल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.