News Flash

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येणार की नाही, पुढील दहा दिवसात ठरणार : करोना टास्क फोर्स

मुंबईमधील वाढता संसर्ग हा चिंतेची बाब

राज्याची राजधानी मुंबईसहीत संपूर्ण राज्यामध्येच बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली. राज्यात दिवसभरात करोनाचे ८,८०७ नवे रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील १,१६७ जणांचा समावेश आहे. राज्याबरोबरच मुंबईतील ही वाढ चिंताजनक आहे. त्यातल्या त्या दिलासा देणारे वृत्त म्हणजे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाली असून बुधवारी करोनामुळे मरण पावलेल्या मुंबईमधील रुग्णांची संख्या केवळ चार होती. असं असलं तरी वाढता संसर्ग हा चिंतेची बाब असून यासंदर्भात इशारा देताना कोव्हिड टास्क फोर्समधील डॉक्टरांनी राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे.

राज्यामध्ये कोरनामुळे झालेल्या ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमध्ये झालेत. कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर राहुल पंडित यांनी राज्यामधील कोरनाबाधितांच्या संख्येमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भात चिंता व्यक्त केलीय. मागील दोन आठवड्यांमध्ये गंभीर प्रकरणं आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे पंडित यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोताना म्हटलं आहे.  “क्रिटीकल केसेस आणि मृत्यूचं प्रमाण मागील ७ ते १४ दिवसांमध्ये रुग्णवाढ झाल्यानंतर वाढलं आहे,” असं सांगतानाच पंडित यांनी पुढील १० दिवसांमध्ये मुंबईमधील करोना परिस्थिती भविष्यात कशी असेल यासंदर्भातील अंदाज बांधता येईल असं म्हटलं आहे. पुढील दहा दिवस मुंबई शहरासाठी करो या मरो अशापद्धतीचे असतील असे संकेत देताना पंडित यांनी बुधवारी जवळजवळ दोन महिन्यानंतर आमच्या रुग्णालयामधील आयसीयू बेडसंदर्भातील विचारणा वाढल्याची माहिती दिली.

अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी २१ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. “करोनाची प्रकरणं आणि पॉझिटीव्ही रेटमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ सहा टक्क्यांची आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत आणि जम्बो कोव्हिड सेंटर्सला बेडची सोय तयार ठेवण्यासंदर्भातील सूचना करण्यात आल्य आहेत,” असंही काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे.

काल पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेणारी आकडेवारी सादर करण्यात आली. यामध्ये करोनाचा वाढता संसर्ग आणि लसीकरण मोहिमेसंदर्भातील आकडेवारीचा समावेश होता. कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये करोना चाचण्या वाढवण्याचे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचे आदेश दिले आहेत. याच बैठकीमध्ये आरोग्य विभागाने फेब्रुवारी महिन्यामध्ये सरकारी प्रकरणांमध्ये वाढ झाली असली तर मृत्यूदर कमी असल्याचे म्हटले आहे. जानेवारी महिन्यामध्ये दैनंदिन करोना रुग्णांचे प्रमाण दोन हजार ९७३ इतके होते. तर मृत्यूदर हा १.७ टक्के होता. फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन करोना रुग्णांचा आकडा हा तीन हजार ३४७ इतका आहे. तर मृत्यूदर ०.४ टक्के इतका आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये बुधवारी दोन हजार १८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्या खालोखाल पुणे आणि परिसरामध्ये एक हजार ८११ रुग्ण, अकोल्यात एक हजार ६७९ रुग्ण, नागपूरमध्ये एक हजार ३२३ रुग्ण आढळून आले. नागपूरमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये १२ जणांचा बुधवारी करोनामुळे मृत्यू झाला.

टास्क फोर्समधील सदस्य असणाऱ्या डॉक्टर शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील १० दिवसांमध्ये राज्यामध्ये करोनाची दुसरी लाट येणार की नाही हे ठरेल. “करोना रुग्णांची वाढ यंदा विदर्भामधून सुरु झाली आहे. या रुग्णवाढीमध्ये नवीन करोना विषाणूंचा स्ट्रेनचा सहभाग नसेल असं म्हणता येणार नाही,” अशी प्रतिक्रिया जोशी यांनी दिलीय. तसेच ज्या लोकांना आधी करोनाचा संसर्ग झाला नव्हता आता ते अधिक फिरु लागल्याने करोना संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली आहे अशी शक्यताही जोशी यांनी व्यक्त केलीय.

कल्याण आणि डोंबिवलीमध्येही रुग्ण संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. येथे बुधवारी करोनाचे १६५ नवे रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये १३० नवे रुग्ण आणि दोन मृत्यू तर पुणे माहनगरपालिका क्षेत्रामध्ये ५५ नवे रुग्ण आणि एक मृत्यू झाल्याची नोंद बुधवारी करण्यात आलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 10:20 am

Web Title: coming 10 days will tell if the state was staring at a second wave says covid task force member scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “…म्हणून मृत्यूआधी स्टेडिअम आपल्या नावे करुन घेतलं”; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर बोचरी टीका
2 इंधन दरवाढीमुळे भाज्या महागल्या
3 पालघरमध्ये पाण्यासाठी वणवण
Just Now!
X