शरणागती पत्करलेला नक्षलवादी विलास कोल्हा याची माहिती

मंगेश राऊत, लोकसत्ता

गडचिरोली : दोन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्य़ात घडलेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार होण्याला नक्षलवाद्यांचा कमांडरच जबाबदार आहे. इंद्रावती नदीच्या काठावर डेरा टाकण्यापूर्वी लढाईतील नियमांची आठवण ठेवली नाही आणि वाचण्यासाठी नदीत उडी घेण्याचा पर्याय निवडला गेला. त्यामुळे ४० जण मारले गेले. त्याउलट प्रतिकार करणारे अनेक वाचले, अशी माहिती पोलिसांसमोर नुकतीच शरणागती पत्करलेला जहाल नक्षलवादी विलास कोल्हा याने लोकसत्ताशी बोलताना दिली.

२२ एप्रिल २०१८ ला गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यात कसनासूर जंगलातील इंद्रावती नदीच्या परिसरात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. त्यात साईनाथ ऊर्फ दोमेश मडी आत्राम, राजेश ऊर्फ दामा रायसू नारोटी, सुमन ऊर्फ जन्नी कुडियेती, नागेश ऊर्फ दुलसा कन्ना नारोटे, शांताबाई मंगली पदा, अनिता रामजी मडावी, नंदू ऊर्फ विक्रम बिच्छा आत्राम, लता वड्डे, क्रांती, कार्तिक उके, जयशीला गावडे या जहाल नक्षलवाद्यांचा समावेश होता. गडचिरोली पोलिसांच्या इतिहासातील हे सर्वात मोठे यश आहे.

या चकमकीनंतर गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवादी चळवळ खिळखिळी झाली. पोलिसांचा आत्मविश्वास वाढला. नक्षल चळवळीला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू लागला. जीवाच्या भीतीने अनेकजण  शरणागती पत्करू लागले. अशा स्थितीत इंद्रावती नदी परिसरात डेरा टाकण्याचा निर्णय चुकीचा होता. जंगलातील लढाईचे काही नियम आहेत. या नियमांचा विसर त्यावेळच्या नक्षल कमांडरला पडला. इंद्रावती नदीच्या सभोवताली तीन डोंगर असून एका बाजूला नदी आहे. डोंगरांच्या पायथ्याशी कधीही डेरा टाकू नये, असा जंगलातील नियम आहे. त्यानंतरही नक्षल कमांडरने तेथे डेरा टाकला. दुसऱ्या बाजूला नदी असून नदीमध्ये ३० ते ४० फूट खोल पाणी होते. या डेऱ्यामध्ये विविध दलमचे ७० नक्षलवादी होते. पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी तिन्ही डोंगरांच्या टोकावरून डेऱ्यावर हल्ला केला. नक्षलवाद्यांना पळण्यासाठी केवळ नदीपात्र उरले होते. नदीत खोल पाणी आणि मगरी होत्या. हे माहीत असतानाही नक्षलवाद्यांनी त्यात उडी घेतली. काहीजण पोलिसांच्या गोळीने मारले गेले तर अनेकजण नदीत उडी घेतल्याने मगरींची शिकार बनले. पहिल्या हल्ल्यातच कमांडर साईनाथचा मृत्यू झाल्याने इतरांना आदेश देणारा कोणीच उरला नाही. काही नक्षलवाद्यांनी नदीत उडी न घेता पोलिसांच्या गोळ्यांचा प्रतिकार (रॅपिड फायर) केला. त्यामुळे जवळपास २५ ते ३० जण वाचले. या हल्ल्यातून वाचलेल्या सात जणांची नंतर एका कंपनीत भेट झाली. तेथे चर्चा झाली असता ४० जणांच्या मृत्यूसाठी कमांडरचा चुकीचा निर्णय जबाबदार होता, हे स्पष्ट झाले, याकडेही कोल्हा याने लक्ष वेधले.