वसई किल्ल्याचा विकास आराखडा सादर करण्याचे पुरातत्त्व खात्याचे महापालिकेला आदेश

आपल्या पराक्रमाने वसईच्या गौरवशाली इतिहास घडवणारे हजारो हुतात्मे काळाच्या पडद्यरआड अज्ञात राहिले होते. आता या हुतात्म्यांना यथोचित गौरव करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. पुरातत्त्व खात्याने महापालिकेला वसईच्या किल्लय़ाचा विकास आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. या आराखडय़ानुसार हुतात्म्यांचे स्मारक उभारले जाणार आहे.

वसई परिसरात पोर्तुगिजांचे राज्य होते. चिमाजी आप्पांनी पोर्तुगिजांविरोधात युद्ध  करून १७३९ मध्ये वसईचा किल्ला जिंकला. मात्र पोर्तुगिजांविरोधात झालेल्या संघर्षांत हजारो स्थानिक वसईकर हुतात्मे झाले. राज्य सरकारच्या गॅझेटनुसार या युद्धात चिमाजी आप्पांच्या सैन्यातील १२ हजार स्थानिक सैनिक हुतात्मे झाले. त्यात स्थानिक आगरी, भंडारी, कोळी, मराठा, मुस्लिम आणि ख्रिस्ती सैनिकांचा समावेश होता. महार पलटणमधील सर्वाधिक सैन्य या युद्धात शहीद झाले होते. पोर्तुगिजांचेही आठ हजार सैनिक मारले गेले होते. मारले गेलेले सारे सैनिक हे वसईचे भूमीपुत्र होते. पंरतु त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. या हुतात्मांचे एकही स्मारक वसईत नाही,

वसईला चिमाजी आपांची वसई असे अभिमानाने संबोधले जाते. मात्र त्याचवेळी वसईला वैभव मिळवून देतांना १२ हजार वसईकर हुतात्मे झाले, त्यांचा विसर पडला असे हरित वसईचे समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी सांगितले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात अनेक भारतीय ब्रिटीश सैन्यातून लढले आणि शहीद झाले. त्यांची स्मारके इस्रायलपासून युरोपपर्यंत आहेत. परंतु वसईच्या लढाईतील हुतात्म्यांचे एकही स्मारक का नाही, असा सवाल डाबरे यांनी केला. वसई जशी चिमाजी आप्पांची आहे, तशीच हुतात्मा झालेल्या वसईच्या भूमीपुत्रांचीहीआहे. त्यांचे यथोचित स्मारक पालिकेने उभारायला हवे, अशी मागणी ते करत होते. आता पालिकेने हे स्मारक उभारण्याची तयारी दर्शवली आहे.

किल्ल्याचा विकास करताना स्मारक उभारणार

महापालिकेने नुकतीच बौद्ध स्तूप आणि वसई किल्लय़ाच्या विकासासाठी केंद्रातून पुरातत्त्व खात्याची परवानगी मंजूर करवून घेतली आहे. केंद्र सरकारने महापालिकेला विकास आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. यापुर्वी किल्ल्याची जागा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित असल्याने आम्हाला काही करता येत नव्हते. परंतु आता वसईच्या लढाईत जे भूमीपुत्र हुतात्मे झाले त्यांचे स्मारक तयार केले जाईल, असे वसई विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव यांनी सांगितले.