शिवसेनेचे संपर्कमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत शिवसैनिकांनी जोरदार आरोप केले. आक्रमक शिवसैनिकांनी शिंदे यांच्यावर तोफ डागल्याने केसरकर यांच्यासह आ. विजय औटी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे त्रस्त झालेले दिसले.
शिवसेनेने नगरच्या संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी केसरकर यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या उपस्थितीत प्रथमच नगरमधील यश ग्रँट हॉटेलमध्ये पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यांनी ही बैठक केवळ दहाच मिनिटांत आटोपती घेतली. केवळ केसरकर यांचेच पाच मिनिटांचे भाषण झाले. जिल्ह्य़ाचा स्वतंत्र मेळावा घेऊ तसेच तालुकानिहाय बैठका आयोजित करू, जिल्ह्य़ात पक्षाला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
त्यांचे भाषण होताच श्रीरामपूरचे राजेंद्र देवकर यांनी लगेच पालकमंत्री शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेतला. पालकमंत्री आम्हाला विश्वासात न घेता परस्पर कामे करतात. अधिकारीही काँग्रेस-राष्ट्रवादी धार्जिणे आहेत. त्यामुळे सत्ता असूनही आमची कामे होत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. त्यापाठोपाठ शिंदे यांच्याच मतदारसंघातील सेनेचे तालुकाप्रमुख वैजनाथ पाटील व महालिंग कोरे यांनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. ज्या खर्डा पाणीपुरवठा योजनेसाठी शिवसैनिकांनी आंदोलने केली, त्याबाबत परस्पर निर्णय होतात, भूमिपूजने केली जातात, शिंदे आम्हाला विश्वासात न घेता कामे करतात, आमच्यापुढे अडचणी निर्माण करतात, असे त्यांनी सांगितले.
तक्रार करणा-या पदाधिका-यांना आ. औटी यांनी गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही पक्षाची बैठक आहे, आम्हाला बोलू द्या, असे म्हणत पदाधिकारी म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करत होते. तुमच्या तक्रारी चार भिंतींत मांडा, येथे पत्रकार आहेत, आहेत, असे सांगत औटी व गाडे यांनी पदाधिका-यांना शांत केले. कर्जत-जामखेडसाठी स्वतंत्र बैठक घेऊ, असे अश्वासन दिले.
जि. प. सदस्य दत्तात्रेय सातपुते यांनी गाडे यांची तर देवकर यांनी उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांची महामंडळावर वर्णी लागावी, अशी मागणी केसरकर यांच्याकडे केली. शहरप्रमुख संभाजी कदम, उपजिल्हा प्रमुख मधुकर राळेभात, राजेंद्र दळवी, अनिल कराळे, सभापती संदेश कार्ले आदी उपस्थित होते.
‘महापौरपद ही संधी’
नगरच्या महापौरपदाची निवडणूक शिवसेना लढवत आहे. ती यशस्वीपणे हाताळा, आपल्यात समन्वय ठेवला तर यश नक्कीच आहे. ही निवडणूक एक संधी समजा. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह व जोम निर्माण होणार आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. मात्र या निवडणुकीच्याच पार्श्र्वभूमीवर पालकमंत्र्यांवरील टीका अनेकांना रुचली नाही. या टीकेने विशेषत: पदाधिकारी अस्वस्थ झाले.