साहित्य क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर समाजातील सर्व स्तरांतून आनंद व्यक्त होताना दिसतो आहे. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे:

भालचंद्र नेमाडे यांची ५० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली ‘कोसला’ ही कादंबरी आजदेखील मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड मानली जाते. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांमधून त्यांच्या लिखाणाचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे. त्यांच्या लेखनाचा विशेष गुण म्हणजे त्यांचे साहित्य जीवनदृष्टीने परिपूर्ण होते. अनेक लेखक सुंदर लेखन करतात, परंतु, त्यामध्ये नेमाडे यांच्या लेखनात असणाऱ्या जीवनदृष्टीचा अभाव असतो. त्यामुळेच नेमाडे यांचे लेखन मराठी साहित्याच्या परंपरेला छेद देणारे ठरते. त्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला आणि मराठी साहित्याची दृष्टी बदलली.
– रामदास भटकळ, पॉप्युलर प्रकाशन

भालचंद्र नेमाडे यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळणे, हा मराठी मातीचा गौरव आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या त्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराचे विशेष महत्त्व आहे. नेमाडे यांनी आजपर्यंत मराठी भाषा आणि साहित्यनिर्मितीशी प्रामाणिक राहून लेखन केले आहे. त्यामुळे त्यांचे साहित्य हे जागतिक दर्जाचे आहे.
– सदानंद देशमुख, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते

भालचंद्र नेमाडे यांना ‘ज्ञानपीठ’ मिळणे ही, मराठी साहित्य आणि समाजाच्यादृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळवणारे ते मराठी साहित्यातील चौथे साहित्यिक आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांमधून पाहायला मिळणारा देशीवाद मराठी साहित्यात काही नवे करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी प्रेरणादायी आहे.
– विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य