सांगली, मिरजेतील घरगुती गॅसच्या दुर्घटनांमुळे जागे झालेल्या जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यात १२८ ठिकाणी छापे टाकून ७३ सिलेंडर जप्त केले. घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणासाठी वापर केल्याप्रकरणी ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यतील सर्व तालुक्यांचे तहसीलदार, पुरवठा निरीक्षक व महसूल कर्मचा-याच्या ३० पथकांनी संपूर्ण जिल्ह्यात गॅस तपासणी मोहीम राबविली.  घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणा-या ६० जणांना पकडण्यात आले.  त्यांच्याकडून ७३ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.  जिल्हा पुरवठा अधिकारी भाउसाहेब गलांडे यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
घरगुती सिलेंडर व व्यावसायिक सिलेंडरांच्या किमतीत तब्बल १४०० रूपयांचा फरक असल्यामुळे घरगुती गॅसचा हातगाडी चालक, हॉटेलमध्ये मोठय़ा प्रमाणावर वापर होत होता. मिरजेत गॅसमुळे घडलेली आगीची दुर्घटना बेकायदा गॅस भरण्यातूनच घडली होती.  शहरातील अनेक रिक्षा चालक व चार चाकी वाहनधारक सीएनजी ऐवजी घरगुती गॅसचा वापर करीत असल्याचे या दुर्घटनेमुळे सिद्ध झाले. याला आळा घालण्यासाठी पुरवठा विभागाने मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात १२८ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये सांगलीत १०४, विटा १८, कवठेमहांकाळ १, मिरज ५ आदींचा समावेश होता. सांगलीमध्ये ५५, विटय़ात ५, कवठेमहांकाळमध्ये ४ तर मिरजेतून ९ सिलेंडर पुरवठा विभागाच्या अधिका-यानी हस्तगत केले असून ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.