News Flash

आयुक्तांपुढेच जैववैद्यकीय कचरा टाकला जातो तेव्हा..!

मनपा आयुक्त अभय महाजन यांनी स्वच्छतेची पाहणी केली. त्यांच्यासमोरच परभणी आयसीयू रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घातक कचरा आणून टाकला! आयुक्तांनी तत्काळ या रुग्णालयास नोटीस देण्याचे आदेश

| July 19, 2015 01:54 am

मनपा आयुक्त अभय महाजन यांनी शनिवारी शहरातील स्टेशन रस्त्यावरील स्वच्छतेची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमोरच परभणी आयसीयू रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी जैववैद्यकीय, मानवी शरीरासाठी घातक कचरा आणून टाकला! या प्रकाराने अवाक् झालेल्या आयुक्तांनी तत्काळ या रुग्णालयास नोटीस देण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा पंचनामाही करण्यात आला.
शहरातील खासगी रुग्णालयातील मानवी शरीरास घातक, टाकाऊ कचरा शहराच्या रस्त्यांलगत कुठेही कसाही फेकला जातो. त्यामुळे शहरातील अनेक कचराकुंडय़ा रुग्णालयाच्याच कचऱ्याने भरल्या आहेत. स्टेशन रस्ता, बसस्थानक परिसरातील नाले, रस्त्यालगत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली आहे. मात्र, अनेक रुग्णालये एजन्सीकडे कचरा न देता आपल्या सोयीप्रमाणे त्याची विल्हेवाट लावतात. शनिवारी आयुक्त महाजन यांनी स्टेशन रस्त्यावरील जि. प. निवासस्थानाजवळील रस्त्याची पाहणी केली. विसावा कॉर्नरवरील कचराकुंडीची पाहणी करीत असताना परभणी आयसीयू रुग्णालय व ट्रामा केअरमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा कचराकुंडीत टाकला. या कचऱ्यात युरेन, कॅथेटर, रक्ताने माखलेले बँडेज, औषधी बाटल्या, सिरींज, राईल्स टय़ूब, सलाईन बॉटल आदींचा समावेश होता. आयुक्त स्वत: अधिकारी-कर्मचाऱ्यांसह उपस्थित असताना कर्मचाऱ्याने कचरा टाकण्याचा प्रताप केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महाजन यांनी तत्काळ स्वच्छता निरीक्षक राजू झोडपे, नागेश जोशी, उपायुक्त रणजित पाटील, फायर ब्रिगेडचे अधिकारी रमेश िशदे, सुरेश पालवे, शेख उस्मान यांना बोलावून घेत रुग्णालयात पाठवले. या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची चौकशी करून पंचनामा केला. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमन १९९८ नुसार नोटीस बजावून कारवाई करण्याचे आदेश महाजन यांनी दिले. सर्व स्वच्छता निरीक्षकांना आपापल्या प्रभागातील रुग्णालय परिसरात जातीने लक्ष देऊन जैववैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास रुग्णालयावर तत्काळ कारवाईचे आदेश बजावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 1:54 am

Web Title: commissioner order garbage hospital notice
Next Stories
1 मुलाच्या अपहरणप्रकरणी लातुरात तीनजणांना अटक
2 जि. प. शाळेत खिचडीतून १०३ विद्यार्थ्यांना विषबाधा
3 रंगतदार तिहेरी लढतीत मूलभूत प्रश्नांना बगल!
Just Now!
X