ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांवर विचारमंथन करण्यासाठी ओबीसी कृती समितीने रविवारी चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत लोकसभा उमेदवाराकडून ओबीसींच्या समस्या सभागृहात मांडू, असे शपथपत्र लिहून घेण्यासंदर्भात ठराव कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीत पारित करण्यात आला. त्यामुळे उमेदवारांना ओबीसी समाजातील समस्या सोडविण्यासाठी शपथपत्र लिहून द्यावे लागणार आहे.
राज्यातील ओबीसी प्रवर्गातील जनतेवर सातत्याने अन्याय होत आहे. ओबीसी जनतेवर अन्यायाचे निराकरण आजपर्यंत शासनाने केले नाही. धरणे आंदोलन, शाळा, महाविद्यालय बंद, रास्ता रोको, मार्चे काढण्यात आले. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. देश स्वातंत्र्य होऊन ६५ वष्रे झाले. मात्र, ओबीसींच्या समस्यांवर अद्यापही तोडगा काढण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी करण्याच्या उद्देशाने परिपत्रकाची होळी करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. मुंबई येथे सामाजिक न्यायमंत्र्यांसोबत बैठक घेऊन ओबीसींच्या समस्यावर चर्चा करण्यात आली. संपूर्ण विदर्भातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.
विदर्भातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. मात्र, शासन वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. शासन ओबीसींच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने आता लोकसभा उमेदवारांकडून ओबीसींच्या समस्या शासनदरबारी मांडू, असे शपथपत्र घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ३१ ऑगस्ट २०१३ चे परिपत्रक रद्द करण्यात यावे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसी समाजातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजना लागू कराव्यात, ओबीसी समाजाचे वर्ग ३ व ४ भरतीतील आरक्षण चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, ठाणे, यवतमाळ, नंदूरबार, रायगड या जिल्ह्य़ातील आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्यात वसतीगृह सुरू करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी विदर्भ संघटक बबनराव फंड, संयोजक सचिन राजूरकर, माळी समाजाचे अध्यक्ष बबनराव वानखेडे, हिराचंद बोरकुटे, दिनेश चोखारे, प्रा. माधव गुरूनुले, राहुल पावडे, शाम राजूरकर, अविनाश पाल, राजेंद्र खांडेकर, डॉ. भगत, सुनील आवारी, बंडू देरकर, रवींद्र झाडे, विजय मोरे, महेंद्र बोबडे, सतीश मालेकर, मधुकर डांगे, राहुल बेले, नामदेव विरूटकर उपस्थित होते.