खासगी कोचिंग क्लासेसमध्ये होणारे गैरप्रकार, क्लासेसच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची होणारी छळवणूक इत्यादी प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने सध्या कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. परंतु, असे प्रकार रोखण्यासाठी एक आचारसंहिता बनविण्याचा सरकार विचार करत असून, त्यासाठी शिक्षणतज्ज्ञ आणि विधिमंडळातील सदस्य यांची समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीचा अहवाल पुढील अधिवेशनापर्यंत मागविण्यात येईल. हा अहवाल सादर झाल्यानंतर याबाबत कायदा करण्याचा निर्णय विधी मंडळात घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधासनभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले.
विधानसभेमध्ये खासगी क्लासेसमध्ये होणारे गैरप्रकार, सायनमधील शाळेमध्ये विद्यार्थिनीवर तिच्या शिक्षकाने केलेले लैंगिक अत्याचार, दादरमधील शाळेच्या आवारात क्लीनरकडून विद्यार्थिनीवर झालेला लैंगिक अत्याचार, अंधेरी येथील शाळेत विद्यार्थिनीवर एका खासगी वाहन चालकाने केलेला बलात्कार इत्यादी विषयावर लक्षवेधी सूचना अमित साटम, संजय पोतनीस आदी सदस्यांनी उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना विनोद तावडे यांनी सांगितले की, खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणणारा कायदा सध्या तरी अस्तित्वात नाही. परंतु, असे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने आचारसंहिता तयार करण्याबाबत आणि सरकारच्या माध्यमातून खासगी क्लासेसविरुद्ध नियंत्रण आणण्याबाबत सरकार विचार करत आहे. खासगी क्लासेसमधील शिक्षण शुल्कावर सरकारचे नियंत्रण नाही. परंतु, विधी मंडळाच्या सर्व सदस्यांनी या सर्व विषयाबाबत एक धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.