हर्षद कशाळकर
अलिबाग- निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. या तडाख्या सर्व दूरसंचार यंत्रणा कोलमडून पडल्या. मात्र यामुळे निर्माण झालेल्या संपर्क कोंडीवर रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनी हॅम रेडिओच्या मदतीने मात केली. आपत्तीच्या काळात हॅम रेडिओ संपर्क यंत्रणेचे महत्वही अधोरेखित केले. प्रशासकीय यंत्रणामधील माहितीच्या आदान प्रदानात या यंत्रणेने महत्वाची भूमिका बजावली. महत्वाची बाब म्हणजे हौशी हॅम रेडीओ चालकांच्या चार पथकांनी सलग ९८ तास विना मोबदला सेवा दिली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात त्यांचे कार्य मोलाचे ठरले.

रायगड जिल्ह्यात ३ जूनला निसर्ग चक्रीवादळ धडकेल असा इशारा हवामान विभागाने दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केल्या. आपत्तीच्या काळात संपर्क यंत्रणा कोलमडून पडतात. त्यामुळे पर्यायी यंत्रणांची तातडीने उभारणी करणे आवश्यक होते. वेळही कमी होता. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी या कामात हौशी हॅम रेडिओ चालकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. अलिबाग येथील हॅम रेडिओ चालक दिलीप बापट यांच्याकडे याकामात मदत करण्याचे विनंती करण्यात आली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलून या कामात सहकार्य देण्याचे मान्य केले.

२ जूनला सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात हॅम रेडिओ यंत्रणेची कार्यान्वयित करण्यात आली. मुरुड, श्रीवर्धन अलिबाग आणि महाबळेश्वर या चार ठिकाणी लहान गाड्यांमधील हॅम स्टेशनची उभारणी करण्यात आली. रायगड पोलीस दलाने हॅम रेडिओ यंत्रणेसाठी म्हसळा, बोर्लीपंचायतन, रोहा, रेवदंडा, अलिबाग, तळा येथे वायरलेस युनीट्स उपलब्ध करून दिले. ३ जूनला निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील किनाऱपट्टीवर धडकले. यात मोबाईल, दूरध्वनी यंत्रणा कोलमडून पडल्या. श्रीवर्धन येथील वायरलेस टॉवरही बंद पडला. अशावेळी हॅम रेडिओ यंत्रणा उपयुक्त ठरली. संपर्क आणि संवादाचे एकमेव माध्यम म्हणून हि यंत्रणा काम करत होती. अलिबागहून महाबळेश्वरला संदेश पाठविले जात होते. तीथून ते श्रीवर्धन कडे पाठविले जात होते. सलग ९८ तास हॅम रेडिओ यंत्रणेच्या माध्यमातून संपर्क आणि संदेश वहनाचे काम अविरत सुरु होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनेचे काम सुसह्य झाले.

अलिबागच्या दिलीप बापट यांच्यासह, कोल्हापुरच्या नितीन ऐनापुरे, ठाण्याच्या अमोल देशपांडे, मंदार गुप्ते, अमित गुरव, योगेश सदरे यांनी या हॅम रेडिओ संचलनात विना मोबदला सहकार्य दिले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोलाचे सहकार्य लाभले. वादळाच्या आपत्तीमुळे निर्माण झालेल्या संपर्क कोंडीवरही मात करता आली. त्यामुळे आपत्तीच्या काळात हॅम रेडीओचे महत्वही पुन्हा एकदा अधोरेखित केले. यापुर्वी हॅम रेडिओ पथकांनी रायगड जिल्ह्यातील अंबेनळी बस दुर्घटनेतही जिल्हा प्रशासनाला असेच सहकार्य दिले होते.

हॅम रेडिओ यंत्रणा

हॅम रेडिओ हि एक बिनतारी संदेश वहन यंत्रणा आहे. जगभरातील हौशी हॅम रेडीओ चालक यामाध्यमातून एकमेकांशी संवाद साधत असतात. माहितीचे आदान प्रदान करत असतात. तीन प्रकारच्या ध्वनीलहरींचा वापर करून या माध्यमातून संवाद साधला जात असतो. अलिबाग मध्ये दिलीप बापट हे एकमेव हॅम रेडिओ ऑपरेटर आहेत. राज्यात मोजकेच हॅम रेडीओ ऑपरेटर कार्यरत आहेत. तर देशात ११ हजार हॅम रेडीओ ऑपरेटर आहेत.

आपत्तीनंतरच्या काळात जिल्ह्यातील विवीध भागातून माहिती घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, त्यांना सुचना देणे अशी काम आम्ही सलग ९८ तास करत होतो. वादळामुळे संपर्काच्या सर्व यंत्रणा कोलमडल्या असतांना आमची यंत्रणा अविरत कार्यरत होती. आपत्ती व्यवस्थापनाचा हा अनुभव खुपच आव्हानात्मक होता. जिल्हाधिकारी यांनी आमच्यावर विश्वास टाकून हि संधी आम्हाला दिली, त्यामुळे ही कामगिरी बजावता आली.
 दिलीप बापट, हॅम रेडिओ ऑपरेटर