शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरु केली आहे. त्याच धर्तीवर खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यातल्या अन्य शहरात देखील ‘कम्युनिटी किचन’ सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात ट्रक वाहतुकीला परवानगी

‘कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेती वापराचे ट्रॅक्टर, हार्वेस्ट्रर आदी वाहनांना पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

आणखी वाचा- Coronavirus: “शेतकऱ्यांकडून दूध, भाजी खरेदी करण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई करा”

केंद्र सरकारच्या विशेष पॅकेजचे स्वागत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे तसेच अन्य उपाययोजनांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्वागत केले.