काही कंपन्या सुरू मात्र, आर्थिक गणित बिघडले

विरार : टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात वसईच्या औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांना नियमांच्या चौकटीत परवानगी मिळाली आहे. मात्र कामगारांची कमतरता कंपन्यांना भेडसावू लागली आहे.

टाळेबंदीत शासनाने शिथिलता आणत आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी काही अटी-शर्ती ठेवून औद्योगिक क्षेत्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार वसईतील अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. अनेक कंपन्यांनी सामाजिक दूरीच्या नियमांचे पालन करून कामकाज सुरू केले आहे. मात्र सध्या कामगार नसल्याने मोठी समस्या उभी राहिली आहे.

मागील दोन महिन्यांपासून वसई-विरारमधील कंपन्या बंद असल्याने सारेच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यात काम करणाऱ्या कामगारांची उपासमार होत असल्याने हजारो कामगार मिळेल त्या मार्गाने आपल्या गावी गेले आहेत. यामुळे कामगारांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. नव्याने जरी कामगार भरती केले तरी त्यांना काम शिकण्यास वेळ लागणार आहे. यामुळे कंपन्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम जाणवत आहे. कमी कामगारांच्या साहाय्याने अनेक कामे करण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. यामुळे आहेत त्या कामगारांकडून अतिरिक्त काम करून घेण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. तर दुसरीकडे दोन महिन्यांहून अधिक काळाने काम पुन्हा सुरू झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.   वसई पूर्व सातिवली येथील कंपनी मालक आशू यादव यांनी सांगितले, कंपनी सुरू तर केली आहे, पण कामगार नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. सध्या केवळ ५ ते ६ कामगार आहेत. आधी २० ते २५ मजूर काम करीत होते. यामुळे आमचे आर्थिक नुकसान होणार आहे.

धुरी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका भांडय़ांची कंपनी चालवणाऱ्या संतोष घाटे यांनी सांगितले की, कामगार कमी असल्याने त्याचा सरळ परिणाम उत्पादनावर होत आहे यामुळे सरळ आर्थिक नफा घटून कंपनीचा मोठा तोटा होणार आहे. यामुळे पुढील काही महिने अशातच दिवस काढावे लागणार आहेत.

सध्या वसईतील बहुतांश कंपन्यांतील मजूर ७० टक्क्यांहून कामगार आणि कर्मचारी गावी गेले आहेत, तर काही कामगार मुंबई, पालघर, ठाणे या परिसरांतील असून प्रवासाची कोणतीही सोय नसल्याने त्यांना कामावर येता येत नाही. यामुळे आहे त्या कामगारांमध्ये आता कंपनीमालक आपला गाडा हाकत आहेत.

कामगारांना कामावरून न काढण्याचे आवाहन

एकीकडे कामगारांची कमतरता जाणवत असताना आता बंद असलेल्या कंपन्यांनी आपापल्या  कामगार आणि कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक तोटय़ाचे कारण देत कामगरांना घरी बसविण्यात येत आहे. या कामगारांना कमी करू नका. त्यांना पुन्हा कामावर घ्या, असे आवाहन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख शंकर बने यांनी केले आहे.