२४ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील पाच मजली इमारत जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत १० जणांनी आपले प्राण गमावले आहेत. अग्नीशमन दल, NDRF च्या पथकाने घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढलं. पाच मजली इमारतीमध्ये ४१ कुटुंब राहत होती. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी महाड येथील घटनास्थळावर भेट देऊन रेस्क्यू ऑपरेशनचा आढावा घेतला. या अपघातात ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलं अशा मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची सरकारी मदत देण्याची घोषणा वडेट्टीवारांनी केली.
पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला दाखल झाल्यानंतर मदत कार्याला आणखी गती मिळाली. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होतं. १० जेसीबी, ४ पोकलेन,१५ डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरु होतं. अग्नीशमन दल आणि NDRF सोबत स्थानिक नागरिक आणि संस्थांनीही या कामात मोठी मदत केली.
या अपघाताला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन वडेट्टीवार यांनी दिलं. याव्यतिरीक्त अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींनाही ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच निवारा गमावलेल्या नागरिकांनाही सरकार आर्थिक मदत करेल असं आश्वासन वडेट्टीवार यांनी दिलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 8:06 pm