यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे कांॅग्रेस उमेदवार शिवाजीराव मोघे निवडून आल्यास मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, या चच्रेनेच सध्या निवडणूक प्रचारात रंगत भरली आहे. शिवाजीराव मोघे हे राज्य मंत्रिमंडळात सामाजिक न्यायमंत्री आहेत. ते लोकसभेवर निवडून गेल्यास मंत्री मंडळातील जागा रिक्त होऊन त्यांच्या जागी आपली वर्णी लावावी, अशी इच्छा माजी खासदार आणि नुकतेच विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेले बंजारा नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे.
देशात बंजारा समाजाची संख्या ११ कोटींच्या आसपास आहे. महाराष्ट्रातही त्यांचे संख्याबळ प्रचंड आहे, तर यवतमाळ -वाशीम मतदारसंघात हा समाज पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, महाराष्ट्रातील ४८ पकी एकाही मतदार संघात कांॅग्रेसने बंजारा समाजातील एकालाही प्रतिनिधित्व दिलेले नाही, असे वारंवार सांगून हरिभाऊ राठोड यांनी विधान परिषदेचे सदस्यत्व मिळविण्यात चाणक्य नीती वापरून यश मिळविले आहे. आता त्यांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत.
मला केवळ विधानपरिषदेपुरते मर्यादित करू नका, असे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सांगून टाकले. यवतमाळ जिल्ह्य़ात कॉंग्रेसमध्ये आदिवासींचे नेते म्हणून शिवाजीराव मोघे हे पहिल्या क्रमांकावर, तर आमदार प्रा. वसंत पुरके दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
एकाच जिल्ह्य़ातील दोन आदिवासी नेत्यांना मंत्रिमंडळात घेता येणे कॉंग्रेसला अडचणीचे जाते. त्यामुळे ज्येष्ठ असलेल्या शिवाजीराव मोघे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले, तर प्रा. वसंत पुरके यांना मंत्रीपदाचा दर्जा असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद देण्यात आले.
मोघे यांना जर लोकसभेत निवडून पाठवता आले तर त्यांच्या मंत्रिमंडळातील रिक्त होणाऱ्या जागी प्रा. वसंत पुरके यांची वर्णी लागू शकते आणि तेच जिल्ह्य़ातील क्रमांक १ चे आदिवासी नेते होतील, हे स्पष्ट आहे. आणखी असे की, निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही पदोन्नतीची आशा आहे.
मोघे लोकसभेत गेल्यास माणिकराव मंत्रिमंडळात स्थान मिळवू शकतात. एकंदरीत शिवाजीराव मोघे लोकसभेत गेल्यास मंत्रिमंडळात रिक्त होणाऱ्या त्यांच्या जागी हरिभाऊ राठोड, प्रा. वसंत पुरके आणि माणिकराव ठाकरे या तीन आमदारांना आपली वर्णी लागेल, अशी आशा असून मोघे यांच्या विजयासाठी कोणतीही कसर बाकी ठेवायची नाही, असा तिघांनीही चंग बांधल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष हे की, यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाला लागूनच असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी विधानसभा मतदार संघाचा समावेश झालेला आहे. चंद्रपूर मतदारसंघात कॉंग्रेसने सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी दिली आहे. संजय देवतळे निवडून आल्यास आपली वर्णी मंत्रिमंडळात लागेल, अशी आशा वणीचे कांॅग्रेस आमदार वामनराव कासावार यांना आहे. कासावार हे वणी मतदारसंघातून तिनदा विजयी आणि एकदा पराभूत झाले आहेत. मंत्री होण्याची त्यांची तीव्र इच्छा आतापर्यंत फळास आलेली नाही. आता मात्र त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. संजय देवतळे लोकसभेत गेल्यास वामनराव कासावार मंत्री होतील, या चच्रेला ऊत आला आहे. विदर्भातून शिवाजीराव मोघे आणि संजय देवतळे हे दोन मंत्री लोकसभेत जाणार आहेत, त्यांच्या जागी दोन आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळणार आहे. त्यापकी एक हरिभाऊ राठोड असतील, असे खुद्द हरिभाऊ राठोड स्वतच खाजगीत सांगत आहेत. राज्यात राजेंद्र गावीत, सुरेश धस हे दोन राज्यमंत्री आणि सुनील तटकरे व छगन भुजबळ हे दोन मंत्री, असे सहा मंत्री लोकसभा निवडणूक लढत आहेत.