News Flash

पिचड कुटुंबियांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार

आदिवासींच्या विकासाचा डंका पिटणारे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील सात शेतकऱ्यांची जमीन खरेदीत फसवणूक केल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली

| December 11, 2013 02:31 am

आदिवासींच्या विकासाचा डंका पिटणारे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील सात शेतकऱ्यांची जमीन खरेदीत फसवणूक केल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याप्रकरणी वेळोवेळी शेतकऱ्यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दबाव आणण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले असून, पिचड कुटुंबियांवर कारवाईसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबाई येथील सात आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी २००३ मध्ये पिचड कुटुंबियांनी अत्यल्प दरात खरेदी केल्या. परंतु, त्याचा मोबदला शेतकऱ्यांना न देता परस्पर खोटे दस्तावेज तयार करून जमिनी स्वतच्या नावावर करून घेतल्या. त्याबाबत शेतकऱ्यांनी पिचड तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दमदाटी करण्यात आली, तर काही जणांवर प्रशासकीय तसेच पोलीस यंत्रणेकरवी दबाव आणत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, जमिनीचा मोबदला म्हणून पिचड यांची पत्नी हेमलता यांच्या नावाने गोविंद भोरू पारधी या शेतकऱ्याला दोन लाख २९ हजार रुपयांचा खोटा धनादेश देऊन फसवणूक केली. याबाबत गिरगांव (मुंबई) येथील जनलक्ष्मी बँकेच्या शाखेत चौकशी केली असता त्या धनादेशाची नोंद आढळली नाही. त्यानंतर तीन लाख ४४ हजार ६८० रुपयांचा खोटा धनादेश देवून पुन्हा एकदा फसवणूक केली. पिचड  कुटुंबियांपैकी हेमंत पिचड यांनी नंतर शेतकऱ्यांजवळील न वटलेले धनादेश काचुर्ली येथे येऊन ताब्यात घेतले.
या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आयुक्त, अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. परंतु अद्याप न्याय मिळालेला नाही. अंबई व काचुर्ली शिवारातील हा भाग असून, या ठिकाणी पिचड  कुटुंबियांकडून झालेल्या नोंदी रद्द करण्यात याव्यात, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात, पिचड  कुटुंबियांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्हा समन्वयक भगवान मधे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2013 2:31 am

Web Title: complaint against madhukar pichad family for cheating farmers
टॅग : Farmers,Madhukar Pichad
Next Stories
1 डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी आर. आर. पाटील यांची कसोटी
2 मेट्रोसाठी वायदा पुढच्या महिन्याचा
3 मराठा आरक्षण बैठकीला सेना, मनसेची दांडी
Just Now!
X