पाणी उत्पादकाची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दमदाटी

पालघर : पालघर येथे वीस लिटरच्या बाटल्यांमधून दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाणी उत्पादकाने दमदाटी करून बुक्क्यांनी मारहाण केली. शहरांमध्ये अनेक ठिकाणी शुद्धतेच्या नावाखाली पाण्याची विक्री केली जात असून यावर नियंत्रण ठेवण्यास प्रशासनाला अपयश आले आहे.

पालघर शहराच्या वेशीवर सुंदरम शाळेजवळ असलेल्या लोकवस्तीमध्ये चित्रकला विषयाचा अभ्यास करणारे काही विद्यार्थी भाडय़ाच्या घरात राहत असून हे विद्यार्थी बालाजी ट्रेडर्स नावाच्या दुकानातून वीस लिटरच्या शुद्ध पाण्याच्या बाटल्या नियमित घेत असत. या पाण्याच्या बाटल्यांमध्ये कधी कधी कचरा येत असल्याने याबाबतची तक्रार त्यांनी संबंधित विक्रेत्याकडे केली होती. मात्र एकदा या शुद्ध पाण्याच्या बाटलीमध्ये जंतू व किडे दिसल्याने त्यांनी या पाण्याच्या शुद्धतेबाबत संबंधित विक्रेत्याकडे आक्षेप नोंदवला.

याची माहिती संबंधित पाणी उत्पादकांना समजल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी हुज्जत घातली आणि मारहाण केली. याविरोधात पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शुद्धतेच्या नावावर अशुद्ध पाण्याची विक्री

पालघर व परिसरामध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिस (आर.ओ.) पद्धतीने पाण्याचे शुद्धीकरण करणारे अनेक उत्पादक आहेत. त्यापैकी अनेक उत्पादकांकडे आवश्यक त्या परवानग्या नाहीत. ज्या बाटल्यांमधून शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो, त्यावर अनेकदा आयएसआय मार्क तसेच उत्पादकाचे नाव, पत्ता इत्यादी माहिती नसते. शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या बाटल्या कालांतराने वापरात न आणणे (टाकून देणे) बंधनकारक असताना जीर्ण झालेल्या बाटल्यांचा फेरवापर होत असल्याचे दिसून आले आहे. शुद्ध पाण्याच्या नावावर अशुद्ध तसेच दूषित पाण्याचा पुरवठा करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा पालघरमध्ये कार्यरत नसल्याने याबाबत नेमकी कोणाकडे तक्रार करावी हा नागरिकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.