‘फेसबुक’वर विरोधी भूमिका मांडणाऱ्या तरुणास धमकी दिल्याबद्दल तृप्ती देसाई यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीवरून देसाई यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार बुधगाव येथील व्यापारी तथा अवामी पक्षाचे कार्यकत्रे अशरफ सलीम वांकर यांनी देसाई यांच्या भूमिकेला विरोध करणारी भूमिका ‘फेसबुक’वर लिहिली होती. यावर देसाई यांनी १६ एप्रिल रोजी सकाळी वांकर यांना मोबाइलवरून संवाद साधत दमदाटी केली. ‘तुला मस्ती आली आहे का? मी महाराष्ट्रभर फिरत असते. माझे कमीजास्त झाले तर तुझेच नाव पोलीस गुप्त वार्ता विभागाला कळवेन.’ अशी धमकी दिली असल्याची तक्रार वांकर यांनी दाखल केली आहे. या तक्रारीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात देसाई यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2016 3:30 am