बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या आणि वादग्रस्त वक्तव्यं करणाऱ्या अभिजित बिचुकलेला खंडणी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. तक्रारदारानेच बिचुकलेंविरोधातली तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे अभिजित बिचुकलेचा बिग बॉसमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी चर्चा रंगली आहे. अभिजित बिचुकलेला अटक झाल्यापासून बिग बॉसची टीम साताऱ्यात ठाण मांडून बसली होती. आता तक्रारदारानेच तक्रार मागे घेतल्याने बिचुकले बिग बॉसच्या घरात दाखल होऊ शकतो अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. बिचुकलेविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीने स्वतःहून न्यायालयात माझी अभिजित बिचकुलेविरोधात कोणतीही तक्रार नाही असं लिहून दिल्यामुळे बिचुकलेला दिलासा मिळाला आहे.

अभिजित बिचुकलेमुळे साताऱ्याचे नाव उंचावले जात होते आणि अभिजित बिचुकले असेच खेळत राहिले तर त्यांना बिग बॉसचे पारितोषिकही मिळेल अशी आशा असल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे. बिचुकलेविरोधात तक्रार स्वतःहून मागे घेतल्याचं तक्रारदार मनोज पठाण यांनी लिहून दिलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

बिग बॉस मराठीच्या सिझन टू मध्ये अभिजित बिचुकलेची सर्वाधिक चर्चा आहे. त्याच्या एकंदरीत स्टाईलमुळे, शिवीगाळ केल्याने तो चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान चेक बाऊन्स प्रकरणात त्याला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्याला जामीनही मिळाला होता मात्र खंडणीच्या प्रकरणी अभिजित बिचुकलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अटकेच्या वेळी अभिजित बिचुकलेने कोणताही विरोध केला नाही. मात्र नंतर राजकीय स्वार्थासाठी जुनं प्रकरण उकरून काढलं गेल्याचा आरोप त्याने केला.

अटक केल्यानंतर न्यायालयात दाखल होण्यापूर्वी अभिजित बिचुकलेचा रक्तदाब वाढला होता. रक्तदाब वाढल्याने त्याला सातारा जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बिचुकलेला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.