खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘देखणा माणूस’ असा उल्लेख केल्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद या चांगल्याच संतापल्या आहेत. विखे यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा त्यानी दिला आहे.

खासदार डॉ. विखे हे सध्या आपल्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देतात. गुंडेगाव (ता. नगर) येथे चार दिवसांपूर्वी त्यांनी साकळाई पाणी योजनेसंबंधी तुमच्याकडे देखणा माणूस आला तर त्याला फक्त पाहायला जात जा. ही योजना फक्त सुजय विखेच करु शकतो, अन्य कोणाचे हे काम नाही, असे वक्तव्य विखे यांनी केले होते. त्यांचा रोख अभिनेत्री दीपाली सय्यद हिच्या दिशेने होता.

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर उपोषण केले. या प्रश्नावर त्यांनी लढाई सुरु केली असून चित्रपटातील कलाकारांचाही त्यांनी पाठिंबा मिळविला आहे. पालकमंत्री राम शिंदे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या सर्वेक्षणासाठी दोन कोटी ३४ लाखाचा निधी मंजूर केला. आता श्रेय लाटण्यावरुन विखे व अभिनेत्री सय्यद यांच्यात चढाओढ सुरु झाली आहे.

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पत्रकारांशी बोलतांना विखे यांच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला. विखे हे सुसंस्कारित घराण्यातील आहेत. ते डॉक्टर व खासदार आहेत. खासदार म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य करीत असतील तर त्यांना स्वत:ला नेता म्हणवून घ्यायचा अधिकार नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीत मला बहीण मानून पाठिंबा मागितला. त्यांना पाठिंबा दिला. मी रिंगणात उतरले म्हणून साकळाई योजनेचा प्रश्न समोर आला. माझ्या अनुषंगाने त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्यांनी माफी मागावी अन्यथा आपण महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी सांगितले.

मीच कामे करणार, माझ्यामुळेच साकळाई योजना होणार असा विखे यांना अहंगंड आहे. विकास कामे करण्यासाठी त्यांना कु णीही अडवलेले नाही. मात्र महिलांचा अपमान करण्याचा त्यांना कोणीही अधिकार दिलेला नाही. त्यांनी माफी मागावी. स्थानिक नेते असेच वागत राहिले तर साकळाई पाणी योजना कृती समिती उमेदवार उभा करील, असा इशाराही सय्यद यांनी दिला आहे.