सोलापूर शहरासह आसपासच्या ग्रामीण पाच तालुक्यांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात न येता उलट वरचेवर वाढतच चालल्यामुळे संपूर्ण शहरासह संबंधित पाच तालुक्यांमध्ये टाळेबंदी  लागू करण्यावर प्रशासनाचे एकमत झाले आहे. त्यानुसार येत्या १६ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते २६ जुलैपर्यंत दहा दिवसांसाठी संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. त्याची घोषणा जिल्हा दंडाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली.

सोलापूर शहराससह लगतच्या उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यासह अक्कलकोट, बार्शी व मोहोळ आदी भागात, जेथे जास्त प्रमाणात बाधित रूग्ण वाढले आहेत, त्या त्या सर्व गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी पुकारण्यात येत आहे.

संपूर्ण संचारबंदीचा आराखडा तयार झाल्यानंतर शनिवारी सायंकाळपर्यंत अंतिम स्वरूप देण्यात आले.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सोलापुरात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याच्या हालचाली प्रशासनाच्या स्तरावर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होत्या. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी त्याबाबत सूतोवाच केले होते. त्यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली आहे. भाजपाचे माजी मंत्री विजय देशमुख यांनी तातडीने संचारबंदी लागू करण्याचा आग्रह धरला आहे. तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, सिटूचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम आदींनी त्यास कडाडून विरोध दर्शविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिका-यांनीही संचारबंदीचा निर्णय घाई गडबडीत न घेता विचारपूर्वक घ्यावा, अशी भूमिका मांडली होती.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरणे यांनी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनावर सोपविला होता. त्यांच्या सुचनेनुसार शनिवारी दुपारी जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची बैठक झाली. या बैठकीत संचारबंदी लागू करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिका सभागृहनेते श्रीनिवास करली यांनीही भाग घेतला होता.

दरम्यान, कोणत्याही क्षणी संचारबंदी लागू होण्याची शक्यता गृहीत धरून शहरात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले. किराणा, भुसार व धान्य दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी उसळल्याचे पाहावयास मिळत आहे.