जिल्ह्य़ात बहुचर्चित ठरलेल्या अशोक (श्रीरामपूर) आणि नागवडे (श्रीगोंदे) या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत अनुक्रमे भानुदास मुरकुटे व राजेंद्र नागवडे या सत्ताधारी गटांची सरशी झाली. दोन्ही कारखान्यांच्या सभासदांनी परिवर्तनाला साथ दिली नाही.
या दोन्ही कारखान्यांची निवडणूक रविवारी झाली होती. मंगळवारी मतमोजणी होऊन सायंकाळी उशिरा सर्व जागांचे निकाल जाहीर झाले. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील गटाने अशोक कारखान्याच्या सर्व म्हणजे २१ जागा ४ हजारांच्या फरकाने जिंकल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जयंत ससाणे-शेतकरी संघटना यांच्या विरोधी गटाला एकही जागा मिळू शकली नाही.
नागवडे कारखान्यातही सत्ताधारी नागवडे गटाने अडीच हजारांच्या फरकाने सर्व जागा जिंकून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पानिपत केले. स्वत: पाचपुते यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही ठिकाणी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.