सातारा जिल्ह्यातली करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. उद्या सकाळी ७ वाजल्यापासून १० मे रात्री १२ वाजेपर्यंत हे कठोर निर्बंध लागू राहणार आहेत.

या नव्या आदेशानुसार जिल्ह्यातली सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर या सर्वांचा घरपोच पुरवठा करण्यास सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या वेळात परवानगी देण्यात आली आहे.

कृषी अवजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या वेळेतच सुरु राहतील. तर या दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यतच सुरू राहतील. तसंच आधीचे इतर नियमही लागू असतील.
दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 घरपोच दारु विक्री सुरु राहील तर बाकीचे नियम मात्र पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधिंतांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.