नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण

गेल्या दोन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा खरीप पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले आहे. पंचनामे करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पंचनाम्यांच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर झळकवण्यात आल्या असून बाधित शेतकऱ्यांनी हरकती असल्यास तातडीने नोंदवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी भात, नागली, वरई व इतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जवळपास पूर्ण केले असून गेल्या आठवडाअखेरीस पूर्ण झालेल्या पंचनामाच्या प्रती संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आल्या आहेत. बाधित शेतकऱ्यांना आपल्या नावात किंवा नुकसानीच्या क्षेत्रफळात हरकती घ्यावयाचे असल्यास त्यांनी त्या लवकरात लवकर घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सुमारे २२ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी कर्जदार व बिगर कर्जदार अशा सुमारे १८ हजार शेतकऱ्यांचे विमा कंपनीमार्फत नुकसानभरपाई देण्याचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीमार्फत भरपाई मिळण्याबाबतचे अर्ज भरले नसतील अशा शेतकऱ्यांनी तातडीने तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

४७ हजार हेक्टर  शेतीचे नुकसान

पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख पाच हजार क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली होती. २० व २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यापैकी सुमारे ३२ हजार क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र ४७ हजार हेक्टरहून अधिक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी दिली आहे.