रोह्य़ातील अंधार आळीत संध्या आनंदाचे वातावरण आहे.  नावात अंधार असला तरी सध्या ती चांगलीच प्रकाशात आलीय.  त्याचं कारणही तसंच आहे. याच आळीत राहणाऱ्या ऋतुजा उपाध्येने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९७.४० टक्के गुण मिळवत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. घरच्या आíथक परिस्थितीवर मात करीत आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ऋतुजाने हे यश मिळवलंय.
रोह्य़ाच्याच मेहेंदळे हायस्कूलमध्ये शिकणारी ऋतुजा लहानपणापासूनच हुशार. पहिला नंबर कधीच सोडला नाही. केवळ अभ्यासातच नाही तर अन्य क्षेत्रातही तिची कामगिरी चमकदारच होती. शेजाऱ्यांपाजाऱ्यांनाही तिचे खूप कौतुक. ऋतुजाच्या ऐन परीक्षेच्या काही दिवस आधी तिचे वडील प्रमोद उपाध्ये यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. मात्र काळजावर दगड ठेवून त्यांनी हा त्रास लपवून ठेवला. आपल्या मुलीला मानसिक त्रास होऊ नये याची त्यांनी जीवावर उदार होऊन काळजी घेतली.
डॉक्टर होण्याचं स्वप्न तिनं उराशी  बाळगलं होतं. एवढं मोठं यश मिळवलं असलं तरी घरच्या आíथक परिस्थितीमुळे तिला आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागतेय. ऋतुजाची आई मीनाक्षी या बालवाडीताई म्हणून काम पाहतात. उरलेल्या वेळेत डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करते. तर वडील शुभ कार्यात स्वयंपाक बनवून देतात. त्यामुळे आíथक उत्पन्नाचा स्रोत मर्यादितच. २५ वष्रे रोह्य़ात भाडय़ाच्याच घरात राहतात. मुलगी कर्तृत्ववान असूनही आíथक कुवत नसल्याने तिला डॉक्टर बनवू शकत नाही याची जाणीव झाल्यानंतर दोघांनाही अश्रू अनावर होतात. मुलीला डॉक्टर करू शकत नाही याचे शल्य दोघांनाही सलते आहे. माझी आई आजारी असताना मी तिच्यावर उपचार करू शकलो नाही . तेव्हापासून आपल्या घरावर डॉक्टरची पाटी लागावी अशी माझी इच्छा होती; परंतु परिस्थितीमुळे माझे हे स्वप्न पुरे होऊ शकत नाही हे सांगताना ऋतुजाचे वडील प्रमोद उपाध्ये यांना रडू कोसळले.
कंपाऊंडर म्हणून काम पाहणाऱ्यांनी आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं हे स्वप्न पाहणं काहीच गर नाही. पण परिस्थिती आडवी येतेय. ऋतुजाला आíथक मदतीचे हात पुढे आले तर तिची स्वप्नपूर्ती व्हायला वेळ लागणार नाही.