शाळा बंद असतानाही शालेय बसचे शुल्क भरण्याची सक्ती  

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : करोना महामारीच्या काळात शाळा बंद असतानाही शाळांनी पालकांच्या मागे शिकवणी शुल्काचा तगादा लावला असतानाच आता शालेय बसचा भारही पालकांवर टाकण्यास खासगी शाळांनी सुरुवात केली आहे. शाळा बंद असतानाही चार महिन्यांचे शालेय बसचे शुल्क भरावे, असा वटहुकूम शाळांनी काढला आहे. यामुळे शाळा पालकांना नवा आर्थिक फास लावत असल्याचा आरोप पालक करत आहेत, तर जिल्हा शिक्षण विभाग याबाबत मूग गिळून गप्प आहे.

यंदा करोना महामारीमुळे शाळा सरू झाल्या नाहीत. त्यामुळे शाळांनी ऑनलाइन शिकवणी वर्ग सुरू करून पालकांकडून शुल्कवसुलीचा सपाटा लावला आहे. त्यातही पालकांना ऑनलाइन पद्धतीमुळे आर्थिक भार सहन करावा लागत असताना आता अनेक शाळांनी पालकांनी शाळेच्या बसचे शुल्कही भरावे, असी सक्ती लावली आहे. यामुळे पालक मोठय़ा कोंडीत सापडले आहेत. तर दुसरीकडे शुल्क न भरल्यास ऑनलाइन शिकवणीत भाग घेता येणार नसल्याचा जाचक नियमही काही शाळा राबवत आहेत. करोना महामारीमुळे आधीच पालक आर्थिक अडचणीचा सामना करत असताना शाळांनी पालकांना शाळेच्या शुल्काबरोबर शैक्षणिक साहित्यही घ्यायला लावले आहे. यामुळे आधी शुल्क त्यानंतर पुस्तकांचे पैसे आणि आता शाळेच्या बसचे शुल्क, मार्च ते जून महिन्याचे शाळेचे शुल्क पालकांनी भरावे, अशी सक्ती काही शाळा करत आहेत. बहुतांश शाळा ५०० ते ७०० रुपये दरमहा बसचे शुल्क आकारात आहेत. पण या वर्षी अजूनही शाळा सुरू झाल्या नाहीत. मुलांनी बसचा वापरही केला नाही तर बसचे शुल्क का द्यायचे, असा सवाल पालकांनी केला आहे.

शाळांना अशी कुठली सक्ती करता येणार नाही. या संदर्भात आमच्याकडे काही तक्रारी आल्या आहेत. आम्ही जिल्हा शिक्षण विभागाकडून या संदर्भात माहिती घेऊन शाळांना अशा प्रकारे कोणतेही शुल्क आकारू नये, असे पत्र काढत आहोत. पालकांनी या संदर्भात वसई शिक्षण विभागाकडे तक्रारी कराव्यात. त्यावर तातडीने कारवाई केली जाईल.

– माधवी तांडेल, गटशिक्षण अधिकारी, वसई