शौचालयासाठी मंगळसूत्र विकणाऱ्या महिलेची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दखल घेतल्यानंतर ग्रामीण भागात शौचालय बांधकामाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली. शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या गावातील घरी व सासूरवाडीत सासऱ्याच्या घरी शौचालय बांधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यत घरी व सासूरवाडीत शौचालय बांधल्याचे प्रमाणपत्र दाखल करण्याची तंबीच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी दिली आहे. त्यामुळे जावईबापूंना सासूरवाडीत शौचालयासाठी विनंती करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामस्वच्छता अभियानांर्तगत प्रत्येकाच्या घरी शौचालय असावे, या साठी अनुदान देऊन शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न केले जातात. ग्रामपंचायत सदस्यांना शौचालय बांधणे बंधनकारकच आहे. मात्र, प्रशासनाला या बाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने शासकीय सेवेत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या मूळ गावी शौचालय बांधण्याचे आवाहन केले होते. परंतु वरिष्ठांच्या आवाहनाला बधतील ते कर्मचारी कसे? त्यामुळे गेल्या १० वर्षांपासून सरकार शौचालयासाठी अनुदान देत असले, तरी त्याचा उपयोग झाला नाही.
विदर्भातील एका महिलेने शौचालयासाठी थेट मंगळसूत्र विकण्याची घटना समोर आली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी याची दखल घेतली. आता मुंडेंनी आपला जिल्हाही आदर्श करण्यासाठी पाणंदमुक्त करा, असे आदेश दिल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाच्या ५१ विभागांतील सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या घरी व सासूरवाडीत शौचालय बांधावे. ३१ डिसेंबपर्यंत दोन्ही घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्रच कार्यालय प्रमुखांकडे दाखल करण्याची तंबी देण्यात आली. शौचालय प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे आता सासूरवाडीत अबोला धरणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही शौचालयासाठी बोलावेच लागणार आहे, तर जावयावर कारवाई होऊ नये, या साठी सासरऱ्या मंडळींना शौचालय बांधण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.