रमेश पाटील

नागरिक विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी आधार कार्ड असणे सक्तीचे केले आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती शिक्षण विभागास आधारकार्ड तयार करणाऱ्या दोन यंत्रांचे संच दिलेले आहेत. मात्र ते हाताळण्यासाठी कोणाची नियुक्ती न केल्यामुळे आधारकार्डसाठी विद्यार्थ्यांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तर अन्य सरकारी कार्यालयातील आधारकार्ड केंद्र बंद झाल्याने वाडा टपाल कार्यालयात आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशापासून ते शिष्यवृत्ती अर्ज भरणे, बँकेत खाते उघडणे, अन्य प्रकारचे दाखले काढण्यासाठी आधारकार्ड असणे सक्तीचे केले आहे. यासाठी शासनाने पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयांमध्ये आधारकार्ड नव्याने काढण्यासाठी तसेच आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आधारकार्ड यंत्राचे दोन संच दिले आहेत. आधारकार्ड यंत्राचे संच हाताळण्यासाठी प्रशिक्षित संगणक चालक मात्र न दिल्याने यंत्र गेल्या दोन महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थी आज आधारकार्ड मिळवण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहे. आधारकार्ड नागरिकांना तात्काळ उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही व्यक्तींना प्रशिक्षण देऊन सदरची यंत्रणा हाताळण्यासाठी पासवर्ड देण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी जोपर्यंत  चालकाची नियुक्ती करत नाही तोपर्यंत ही यंत्रणा सुरू करता येत नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

बहुतांशी सरकारी कार्यालयांत तसेच बँकांमध्ये आधारकार्ड काढण्यासाठी तसेच आधारकार्डमध्ये झालेल्या चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी  सुविधा उपलब्ध केली होती. मात्र वाडा तालुक्यातील सर्वच बँकांनी व तहसीलदार, प्रांत , तलाठी कार्यालय यांनी या सुविधा बंद केल्या आहेत.  वाडा शहरातील टपाल कार्यालयात या एकमेव ठिकाणी सध्या आधारकार्ड नव्याने काढणे अथवा आधारकार्डात दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी एकच मशीन असल्याने आधारकार्डसाठी येथे दररोज रांगा लागलेल्या दिसतात. संपूर्ण तालुक्यात आधारकार्डासाठी अन्य कुठेच सुविधा नसल्याने वाडय़ातील टपाल कार्यालयात या एकमेव ठिकाणी आधारकार्डासाठी मोठी गर्दी दिसून येते.  वाडा शहरात अन्य ठिकाणीही आधारकार्ड केंद्रे सुरूकरावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कार्यालयीन वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. मात्र संपूर्ण तालुक्यात फक्त टपाल कार्यालयातच ही सुविधा असल्याने दररोज येणाऱ्या शेकडो नागरिकांना सेवा देणे अशक्य असल्याने अनेकांना नाराज होऊन परत जावे लागते.

– दीपक निकम, उप पोस्टमास्तर, टपाल कार्यालय वाडा.