नांदेड लोकसभा मतदारसंघातील १२ जि. प. गटात काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आघाडी मिळू शकली नाही. जि. प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या येवती गटातही काँग्रेसला आघाडी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. या जि. प. गटासाठी सर्वाधिक निधी देण्यात आला होता. या गटातून आघाडी असल्याचा दावा दोन दिवसांपूर्वी बेटमोगरेकर यांनी केला. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांनी आकडेवारीसह हा दावा फोल असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ज्या १२ गटांतून चव्हाण यांची पिछेहाट झाली, तेथील सदस्य राजीनामा देणार का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
हातकणंगले (सांगली) लोकसभा मतदारसंघातील कवठेपिरान जि. प. गटात काँग्रेस उमेदवाराला आघाडी देऊ न शकलेल्या भीमराव चव्हाण यांनी राजीनामा दिला. तसे वृत्त आल्याने नांदेड जिल्ह्य़ातही त्याचे अनुकरण होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. चव्हाण यांच्यासाठी प्रचारयंत्रणा लावणाऱ्या नेत्यांनी गट व गणनिहाय मतांच्या आकडेवारीचे संकलन अजून केले नाही. हे आकडे संकलित झाल्यानंतर संबंधितांची झाडाझडती होईल, असे सूत्रांनी सांगितले. जि. प. पदाधिकारी व सदस्यांच्या कारभाराचा फटका चव्हाण यांना काही गटांमध्ये बसल्याचे चित्र आहे.
नरसी, माजरम, मालेगाव व बळीरामपूर या जि. प. गटात काँग्रेसला अधिक मते मिळाली नाहीत. मात्र, स्वपक्षीयांपैकी अनेकांना आपापल्या गटात आघाडी देता आली नाही. त्यामुळेच चव्हाण यांची मते तुलनेने कमी झाली. असेच चित्र कायम राहिल्यास देगलूरसह मुखेड, नायगाव या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला फटका बसू शकतो. नायगाव मतदारसंघात धोका अधिक आहे. पक्षाने ही जागा सहयोगी आमदार वसंत चव्हाण यांच्यासाठी सोडवून घेतली असली, तरी त्यांना आव्हान देण्यासाठी तेथे राष्ट्रवादीची मंडळी सज्ज झाली आहेत. प्रचारादरम्यान उमरी येथील सभेतही त्याचा प्रत्यय आला.
देगलूर-बिलोली विधानसभा क्षेत्रात चव्हाण यांना नाममात्र आघाडी असली, तरी देगलूर व बिलोली पालिका क्षेत्राने त्यांना प्रामुख्याने तारले. नांदेड उत्तर व दक्षिण मतदारसंघातील वाडी, लिंबगाव, सोनखेड, बळीरामपूर, वाजेगाव या पाचही जि. प. गटात काँग्रेसला आघाडी असल्याचे सांगितले जाते. वाडी गटात २ हजार मतांचे तर दक्षिणमधील सर्कलमध्ये चव्हाणांना सुमारे १० हजार मतांचे मताधिक्य आहे.
मुखेड तालुक्यात जांब गटाचे चित्र स्पष्टपणे समोर आले नाही. पण राजबंधूंचे चुलतबंधू बळवंत माधवराव पाटील बेटमोगरेकर यांच्या एकलारा गटातही काँग्रेस पिछाडीवर आहे. बेटमोगरेकर परिवाराच्या गावात काँग्रेसला आघाडी हीच यातील दिलासादायक बाब मानली जाते. धर्माबाद तालुक्यात दोन्ही सर्कलमध्ये काँग्रेस सदस्य आहेत, पण तेथे भाजप उमेदवाराला ‘लीड’ असल्याचे सांगितले जाते. देगलूर तालुक्यात व्यंकटेश संबुटवाड यांच्या गटात, तसेच बिलोली तालुक्यातील लोहगाव गटातही काँग्रेस पिछाडीवर आहे. अर्धापूर-मुदखेड तालुक्यातील ४ जि. प. गटांमध्ये काँग्रेसला आघाडी आहे.