काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी ‘राष्ट्रवादी’सह अन्य समविचारी पक्षांसोबत मैत्रीचा नवा अध्याय सुरू करण्याची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची चव्हाण भेट घेणार आहेत.
चव्हाण शुक्रवारी नांदेडमध्ये होते. लातूर येथे त्यांनी पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. महायुतीच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीह अन्य समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्षाबाहेर गेलेल्यांपैकी काँग्रेस विचारधारेशी कायम असणाऱ्यांना स्वगृही आणण्याचा, तसेच पक्ष संघटनेत नसलेले पण काँग्रेसचा विचार मान्य असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर पक्षकार्यात यावेत, असाही प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारविरुद्ध वेगवेगळ्या प्रश्नांवर विधिमंडळात व बाहेर संघर्ष करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मुस्लीम आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे आलेल्या आपत्तीत शेतकऱ्यांना ठोस मदत करून दिलासा देण्याची मागणी चव्हाण यांनी केली.
उद्या सूत्रे स्वीकारणार
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शुक्रवारी रात्री शहरात दाखल झालेल्या चव्हाण यांच्या अभिनंदनासाठी सकाळी काँग्रेस कार्यकर्ते व हितचिंतकांची झुंबड उडाली. चव्हाण नव्या पदाची सूत्र सोमवारी (दि. ९) स्वीकारणार आहेत. या वेळी पक्षाचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. चव्हाण यांचे शिवाजीनगरातील पटांगणात स्वागत करण्यात आले. माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूकर व वसंतराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, सरचिटणीस श्याम दरक, संजय लहानकर, उपमहापौर आनंद चव्हाण आदींची उपस्थिती होती.