पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘चाचा-भतिजा’ने महाराष्ट्राला गुलाम बनवले असे म्हणत होते, तेच मोदी आणि ‘चाचा भतिजा’ एकत्र आहेत. आता महाराष्ट्राचे कसे होणार, अशी चिंता ऑल इंडिया मजलिस-ई ईत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैेसी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील दलित जनतेने आता आपल्यातूनच प्रतिनिधी निवडावा असा सल्लाही त्यांनी दिला.
खा. ओवैसी, औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील, पँथर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गंगाधर गाडे व इतर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथे भेट देऊन तिहेरी हत्याकांडातील जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर ते नगरच्या सरकारी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रात आम्ही कोणाही बरोबर नाही, स्वतंत्र आहोत. राज्यात केवळ २४ जागा लढवल्या तर काँग्रेस ४४ जागांवर घसरली. त्यांना त्रास होऊ लागल्याने आमच्या नावाने पोटदुखी सुरु झाली. आम्ही ५० जागा लढवल्या तर त्यांचे कसे होणार, असा प्रश्न ओवैसी यांनी केला. काँग्रेसबरोबर नाही, याचा अर्थ काँग्रेस म्हणजे कोणी धर्मनिरपेक्षतेचा शिक्का नाही. त्यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरजही नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. आ. अब्दुल सत्तार यांनी मोदींची एमआयएमला साथ असल्याचे वक्तव्य केले होते, त्यासंदर्भात ओवेसी यांनी त्यांची ‘जोकर’ अशी संभवना केली. काँग्रेसला १५ वर्षांच्या कारभारामुळेच विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्याची वेळ आली, अशी टिकाही केली.
मराठा-मुस्लीम आरक्षणाबद्दल सरकार बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच न्यायालयाने स्थगिती दिली. आता सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडावी, अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, काँग्रेस सरकारने हा निर्णय निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन घेतल्याने त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, असेही ओवैसी म्हणाले.
सोलापुरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपाबद्दल ओवैसी म्हणाले की, सन २००४ ते १२ दरम्यान आम्ही मनमोहनसिंग सरकारला पाठिंबा दिला, त्यात सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते. त्यांनी कार्यालयात बोलावून आम्हाला चहा-बिस्किटे दिली, त्यावेळी पाठिंबा घेताना आम्ही देशद्रोही वाटलो नाही का? सोलापूर ही काही शिंदे यांची खासगी मालमत्ता नाही. स्वत: शिंदे निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांच्याही विरोधात निवडणूक लढवू, प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करणारच.
पोलिसांना आरोपी माहिती आहेत
जवखेडय़ात दलितांची हत्या झाल्यानेच आरोपी पकडले जात नाहीत, हे सरकार व पोलिसांचे अपयश आहे, असा आरोप ओवैसी यांनी केला. हत्याकांड एका छोटय़ा खेडय़ात झाले आहे, त्यामुळे आरोपी पोलिसांना माहिती आहेत परंतु पकडत नाहीत. आरोपी लवकर पकडले गेले नाही तर दलितांचा यंत्रणांवरील विश्वास उडेल, त्यामुळे तपास सीबीआयकडे द्यावा, दलित हत्याकांडाची ही तिसरी घटना आहे. दलित, मुस्लिमांनाही राज्यात सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे  हे सरकारने दाखवून द्यावे, अशी आमची मागणी आहे, मुख्यमंत्र्यांनी घटना गांभीर्याने घ्यावी, असेही ते म्हणाले.
विश्रामगृहावर मोठी गर्दी
ओवैसी यांना भेटण्यसाठी मुस्लीम युवकांनी मोठी गर्दी केली होती. घोषणाही दिल्या जात होत्या. हिंदुत्ववादी संघटनाही आंदोलन करतील या शंकेने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सशस्त्र धडक कृती दलेही तैनात होती. सरकारी विश्रामगृहाला जणू छावणीचे स्वरुप आले होते. ओवैेसी यांनी दोन शब्द तरी बोलावेत यासाठी युवक आग्रही होते, त्यातून मोठा गोंधळही उडाला.