19 September 2020

News Flash

रायगड पावसाळी पर्यटन : दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक  

गेल्या दोन वर्षांत ३५ हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला

हर्षद कशाळकर, अलिबाग

मुंबईतील ट्रॉम्बे येथून सहलीसाठी आलेल्या तीन तरुणांचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाला. त्यापूर्वी फणसाड धरणात रोह्य़ातून सहलीसाठी आलेल्या दोन भावंडाचा बुडून मृत्यू झाला. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षांने पुढे आला आहे. सुरक्षित वर्षां सहलींसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सहलीसाठी येणारे पर्यटक दुर्घटनांमध्ये दगावण्याचे प्रकार नवे नाहीत. गेल्या दोन वर्षांत ३५ हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. यात प्रामुख्याने कर्जत, खोपोली, मुरुड आणि माणगाव पावसाळी पर्यटन केंद्रांवर या दुर्घटना घडल्या.

या दुर्घटनांना पर्यटकांचा आततायीपणा कारणीभूत ठरतो. मद्यपान करून पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटकही अपघातास कारणीभूत ठरत आहेत. जिल्ह्य़ात सातत्याने घडणाऱ्या या दुर्घटना लक्षात घेऊन माणगाव, कर्जत आणि खोपोली येथील पावसाळी पर्यटन केद्रांवर प्रवेशबंदी करण्यात आली. त्यावरून बराच गदारोळ झाला. पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. स्थानिकांचे रोजगार बुडत असल्याने त्यांनीही यावर आक्षेप नोंदवला. अखेर प्रशासनाने ही बंदी मागे घेतली. यानंतर या ठिकाणांवर पर्यटकांना सूचना देणारे फलक लावण्यात आले. स्थानिकांच्या मदतीने येणाऱ्या पर्यटकांची नोंद ठेवण्याचे काम सुरू झाले. देवकुंड धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांनी एक स्थानिक गाइड सोबत नेण्याची सूचना केली जाऊ  लागली. मात्र पर्यटकांना हा जाच वाटू लागला. त्यामुळे स्थानिक विरुद्ध पर्यटक असे वादाचे प्रकार घडले.

जिल्ह्य़ात धरणांवर आणि धबधब्यांवर वर्षांसहलींसाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही मोठे आहे. पावसाचा जोर वाढल्यास या धरणांमधून आणि धबधब्यांमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढतो. त्याचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून जातात.

समुद्रकिनाऱ्यावरील परिस्थिती काहीशी वेगळी असते. पर्यटकांना समुद्राला येणाऱ्या भरती-ओहोटीचा अंदाज नसतो. याशिवाय पाण्यातील अंतर्गत प्रवाहांची माहिती नसते. स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून पर्यटक खोल पाण्यात उतरतात आणि नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडतात.

ही परिस्थिती चिंताजनक आहे. निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाचा आनंद लुटताना जीव धोक्यात येणार नाही याची खबरदारी घेणे आणि स्थानिक नागरिकांच्या सूचनांना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा दुर्घटना घडतच राहतील.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी..

पर्यटकांना स्थानिक परिस्थितीची माहिती देणारे सूचना देणारे फलक बसवणे, धरण, धबधबे, नद्या आणि तलावांमध्ये वर्षांसहलीला येणाऱ्या पर्यटकांना पोहण्यासाठी सुरक्षित ठिकाणे निश्चित करणे, रिंग बोयाज, लाइफ जॅकेट्स आणि मदत व बचाव सामग्री सज्ज ठेवणे आवश्यक आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाण्याच्या पातळी वाढू शकते, याची माहिती देऊन पर्यटकांना सतर्क करणे गरजेचे आहे.

सतत होणाऱ्या दुर्घटनांमुळे पर्यटन स्थळांची नकारात्मक प्रसिद्धी होत आहे. त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसतो. पर्यटकांना योग्य सूचना दिल्या गेल्या, सहलीसाठी सुरक्षित ठिकाणे निश्चित केली, तर या दुर्घटना टाळता येऊ  शकतील. पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिकांनी काही प्रमाणात पुढे येणे गरजेचे आहे. पर्यटनस्थळांवर बंदी घालणे हा उपाय नाही.

– महेश सानप, संचालक, वाइल्डर वेस्ट अ‍ॅडव्हेंचर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 3:38 am

Web Title: concrete measures must to avoid accident during adventure tours in raigad zws 70
Next Stories
1 मंत्र्यांच्या जिल्ह्य़ात विकासाचा अनुशेष कायम!
2 शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे नव्या वादाला तोंड
3 वसईतील लघुउद्योग क्षेत्रापुढील आव्हानांवर आज चर्चा
Just Now!
X