पालघर-बोईसर रस्त्यावरील ५०० मीटरच्या पट्टय़ाचे डांबरीकरण रद्द

पालघर : पालघर- बोईसर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री हनुमान मंदिर या सुमारे ५०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. हे काम मंगळवार मध्यरात्रीपासून सुरू होणे अपेक्षित असून यामुळे या मार्गावरील फक्त एकच दिशेने वाहतूक सुरू राहणार आहे.

पालघर- बोईसर या मार्गावर सुमारे ५०० मीटर लांबीच्या पट्टय़ामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याची दुर्दशा होत असे. या भागात राज्य परिवहन मंडळाचे आगर तसेच मासळी बाजार असल्याने या रहदारीच्या मार्गावर रस्त्यामध्ये खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाअंतर्गत रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याच्या कामामध्ये या भागातील काँक्रिटीकरण करण्याचे काम प्रलंबित राहिले होते. या रस्त्याखाली नगर परिषदेची पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी जात असल्याने स्थलांतर करणे किंवा नव्याने पर्यायी जलवाहिनी टाकण्याचे कामही शिल्लक होते. रस्त्याकडेला असलेल्या खासगी मालमत्ता आणि त्यालगत असलेल्या गटाराच्या रुंदीकरणामुळे काही प्रमाणात समस्या निर्माण होत असल्याने या भागात काँक्रिटीकरण करण्याऐवजी डांबरीकरण करावे, अशी मागणी काही स्थानिक रहिवासी व राजकीय मंडळींनी केली होती.

वाहतुकीत बदल

सध्या पाच मीटर रुंदीच्या या रस्त्याचे सात मीटपर्यंत रुंदीकरणाचा आणि काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने कायम ठेवला असून मंगळवार मध्यरात्रीपासून या कामाला आरंभ करण्यात येणार आहे. या कामामुळे पालघरकडे येणाऱ्या रस्त्याची वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असून पालघरहून बोईसर किंवा मनोर बाजूला बाहेर पडणाऱ्या वाहनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पालघर बाह्यवळणमार्गे प्रवास करावा लागणार आहे. या आशयाची जाहीर सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.