News Flash

“राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा”

जिल्हा प्रशासनांना मुख्य सचिवांचे निर्देश; ऑक्सिजन, रेमडेसिविर, रुग्ण व्यवस्थापनाचा घेतला आढावा

संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज(शुक्रवार) जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलीस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टँकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.

राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडेसिविरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्यासह विशेष कार्यधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सचिंद्र प्रताप सिंह, अमीत सैनी, अश्वीन मुदगल (ऑक्सिजन उपलब्धतेसाठी), दीपेंद्र कुशवाह (ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी) आणि विजय वाघमारे (रेमडीसीवीर उपलब्धतेसाठी) उपस्थित होते.

टास्क फोर्सच्या सूचनेनुसार रुग्णांना ऑक्सिजन द्यावा –
राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. यासोबतच सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव कुंटे यांनी दिले. त्यामध्ये रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जात आहे का? तो वाया जावू नये यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन होत आहे याबाबींची तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणुक यंत्रणा याठिकाणी ऑक्सिजन गळती होत नाहीये ना तो वाया जात नाहीये याची पाहणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घ्या –
सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे जेणेकरून सिलेंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील अवलंबत्व कमी करता येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा –
राज्यात ऑक्सिजन टँकरची वाहतुक कुणीही रोखू नये त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलीस संरक्षणात या टँकरची वाहतूक करण्यात यावी कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन टँकर वळविण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात नियोजनबद्धरित्या ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा असे सांगतानाच आज रात्री (शुक्रवारी) विशाखापट्टणम् येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन टँकर येणार असून त्यातील चार नागपूर आणि नाशिक येथे पाठविण्यात येतील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

यावेळी मुख्य सचिवांनी राज्यातील उपलब्ध ऑक्सिजनचा आढावा घेतला. राज्यात अन्य ठिकाणांहून जो ऑक्सिजन आणला जात आहे त्याच्या साठवणुकीची सुविधा तयार करावी, असे निर्देशही कुंटे यांनी यावेळी दिले. रेमडीसीवीर उपलब्धतेबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 9:15 pm

Web Title: conduct fire and oxygen audit of all hospitals in the state chief secretary sitaram kunte msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पालकांना मोठा दिलासा; वाढीव फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना परिक्षेला बसण्यापासून रोखता येणार नाही!
2 वर्धा : जम्बो कोविड केंद्रासाठी खासदार तडस यांनी घेतली फडणवीसांची भेट
3 हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
Just Now!
X